दिलीप मोहितेविटा : येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात महाविकास आघाडी व्हावी, यासाठी दोन्ही काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनुकूलता दाखविल्याने महाविकास आघाडीसाठी दोन्ही काँग्रेस नेत्यांत चर्चा सुरू आहे. दरम्यान, बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी करून लढविण्यावर शिक्कामार्तब होणार असल्याचे संकेत आहेत.बाजार समितीच्या गेल्या तीन निवडणुका शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी माजी सभापती ॲड. बाबासाहेब मुळीक यांच्याविरोधात एकत्रित लढविल्या होत्या. या बाजार समितीचे कार्यक्षेत्र खानापूर व कडेगाव हे दोन तालुके आहेत. कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे नेते मोहनराव कदम यांची ताकद सर्वाधिक आहे.परंतु गेल्या तीनही निवडणुकांमध्ये कदम गटाला सभापतिपदे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही मिळाली नसल्याची नाराजी कदम गटाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. गेल्या पाच वर्षांत बाबर गटाकडे सभापतिपदे राहिली. एवढेच नव्हे तर बाबर गटाच्या संचालकांना खूश करण्यासाठी महिन्या-दीड महिन्यात सभापती बदलण्यात आले. सर्व सभापतिपदे बाबर गटास दिली. ही सलही कदम समर्थकांना आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप यांच्यात नैसर्गिक युती आहे.त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे गट) यांची काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी करून सत्ताधारी गटासमोर मोठे आव्हान आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व डॉ. विश्वजित कदम यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विटा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत.राष्ट्रवादीशी चर्चा सुरूविटा बाजार समितीसाठी आमदार अनिल बाबर यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे गट) यांची संयुक्त महाविकास आघाडी करण्यासाठी काँग्रेसचे नेते अशोकराव गायकवाड, युवा नेते विठ्ठलराव साळुंखे व रामरावदादा पाटील समर्थक गट अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीशी चर्चा सुरू झाली आहे.
बाजार समिती निवडणूक: विट्यात महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 4:17 PM