अविनाश कोळी■ सांगली |
महायुतीच्या पाच पांडवांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीच्या भाजपमध्ये पुन्हा महाभारत रंगले आहे. आ. संभाजी पवार गटाने कोणत्याही पदाधिकार्याला विचारात न घेता परस्पर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याने, मानापमान, संशयकल्लोळ अशा नाटकांची घंटाही वाजली आहे. लोकसभेच्या रणांगणात शमी वृक्षावर टांगलेली शस्त्रे काढून आता पवार गटाने विधानसभेच्या युद्धासाठी शंखनाद केल्याने, निष्ठावंत धर्मसंकटात पडले आहेत. स्वत:चे हस्तिनापूर नसतानाही भाजपमध्ये सातत्याने याठिकाणी महाभारत घडत राहिले. पक्षात वर्चस्व कोणाचे, यावरून प्रदीर्घ काळ याठिकाणी संघर्ष चालू आहे. सांगलीत एकसंधपणे कधीही भाजपने निवडणूक लढवली नाही. आंदोलने, बैठका आणि अन्य कार्यक्रमांमध्येही नेत्यांचा सवतासुभा दिसून आला. पवार गटाची आंदोलने वेगळी, पदाधिकारी व अन्य गटाची आंदोलने वेगळी, दोन्ही गटांची वेगवेगळी कार्यालये, अशा अनेक गोष्टींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कधीही खंड पडला नाही. संभाजी पवारांनी कधीही भाजपच्या अधिकृत कार्यालयात हजेरी लावली नाही. भाजपच्या पदाधिकार्यांनी अपवादानेच मारुती चौक व त्यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात हजेरी लावली, पण मनाने हे दोन गट कधीही एकत्र आले नाहीत. भाजपचा हा सांगलीचा इतिहास आता नव्या महाभारताच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अनेक बदलांचे संकेत देत महाभारताचे हे कथानक पुढे जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गटा-तटांच्या राजकारणाला बळ मिळाले. वर्चस्वाच्या प्रश्नावरून तत्त्वांचे राजकारण खेळण्यात आले. पवार गटाने शस्त्रे म्यान करून दुसर्या प्रांतात राजू शेट्टींकरिता शड्ड ठोकला. अर्थात ही पक्षीय बांधिलकीची औपचारिकता होती की शेट्टींचे प्रेम, याबद्दल भाजपमधील कार्यकर्त्यांमध्येच साशंकता आहे. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच पवार गटाने विधानसभेच्या निवडणुकीसाठी शड्ड ठोकला आहे. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. सांगलीच्या मारुती चौकातच असलेल्या केशवनाथाच्या साक्षीने त्यांनी बैठक घेतली. सांगलीच्या तरुण भारत स्टेडियमवर पाच पांडवांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, राजू शेट्टी आणि महादेव जानकर या पाच पांडवांना निमंत्रित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या बैठकीला ना जिल्हाध्यक्ष उपस्थित होते, ना अन्य पदाधिकारी. त्यामुळे परस्पर हा निर्णय घेतल्याने दुसर्या गटाच्या नाराजीत भर पडली आहे. गोपीनाथ मुंडेंची भेट घेऊन पवार गटाने सांगलीत विधानसभेची तयारी सुरू केल्यानंतरही दुसरा गट नाराज होता. पक्षीय स्तरावर परस्पर पवार गटाला उमेदवारीचे आश्वासन कसे दिले, याबाबत विचारणा करण्यासाठी दुसर्या गटानेही मुंडेंची भेट घेतली होती. आता परस्पर पवार गटाने हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतल्याने निष्ठावंत गटाला धक्का बसला आहे. महायुतीचे हे पाच पांडव पवार गटाच्या कार्यक्रमाला येणार का? आले तर त्या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार का? की गटबाजीचे राजकारण नको म्हणून पक्षीय नेतेच वेगळी भूमिका घेतील का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. इनामदारांचे सोयीस्कर राजकारण भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार यांनी सोयीस्कर राजकारणाची वाट निवडली आहे. संभाजी पवारांच्या भूमिकेबद्दल ते काहीही बोलण्यास तयार नाहीत. मुंडेंच्या भेटीवेळी ते मुंबईत उपस्थित असतानाही त्यांनी आपण त्याठिकाणी नसल्याचे सांगितले. प्रतिक्रियेसाठी पत्रकारांनी त्यांची भेट अथवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते प्रतिसाद देत नाहीत. कोणत्याही गटाला न दुखावण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आहे. पवार गटाच्या बैठकीबाबत आपणास कोणतीही कल्पना नाही. सत्कार कार्यक्रम किंवा अन्य कोणत्याही गोष्टीबद्दल आताच काही बोलायचे नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही योग्य भूमिका जाहीर करू. - नीता केळकर, उपाध्यक्षा, भाजप महिला मोर्चा |