अशोक पाटील ।इस्लामपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत पेठनाक्यावरील महाडिक गटाची मदत घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सत्ता मिळाल्यानंतर त्यांना विसरणारे नेतेही कमी नाहीत. यावर पर्याय म्हणून पंचायत समितीचे विरोधी गटनेते राहुल महाडिक यांनी ‘महाडिक बँ्रड’च्या कुबड्या चर्चेत आणून विधानसभा निवडणुकीत नवा प्रयोग करण्याची तयारी चालवली आहे.
कोणत्याही पक्षाचा नेता पेठनाक्यावर आला की महाडिकांकडून त्याचा तलवार देऊन सत्कार केला जातो. निवडणुकीत महाडिक म्हटले की, साम-दाम-दंड-भेद हे राजकीय गणित जिल्ह्याला माहीत आहे. याचा फायदा काही नेत्यांनी उठवला आहे आणि सत्ताही मिळवली. पण नानासाहेब महाडिक यांना राजकीय पद देण्याची वेळ आली की हेच नेते त्यांना विरोध करण्यासही मागे-पुढे पाहात नाहीत. याचा अनुभव त्यांना विधानपरिषदेच्या दोन निवडणुकीत आला आहे.
महाडिक घराण्यातून आता युवा नेतृत्व पुढे आले आहे. नानासाहेब यांचे पुत्र राहुल महाडिक यांनी विविध संस्था उभ्या करून संपर्क वाढवला आहे; तर धाकटे पुत्र सम्राट महाडिक यांनी क्रीडा क्षेत्र, सामाजिक चळवळीवर भर देऊन युवा शक्तीच्या माध्यमातून ताकद वाढवली आहे. या दोघांची ताकद आता काही नेत्यांना पचनी पडत नाही. त्यातच घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आणण्यात आला आहे. त्यामुळे काही नेत्यांना महाडिक बंधूंनी नानासाहेब महाडिक यांचे पारंपरिक राजकारण पुढे चालवावे असे वाटते. स्वत:ला पद घेण्यापेक्षा दुसºयाला सत्ता मिळवून द्यावी, अशी भावना वाळवा-शिराळ्यातील काही नेत्यांची आहे. त्यावर आता राहुल महाडिक यांनी संपर्क दौºयात ‘महाडिक ब्रँडच्या कुबड्या’ राजकीय बाजारात आणल्या आहेत.
यापूर्वी महाडिक यांच्या कुबड्या घेऊन वाळवा-शिराळ्यातील नेत्यांनी सत्ता मिळवली. आता त्याच कुबड्यांचा वापर करून मोठे झालेल्यांचा उपयोग आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला व्हावा यासाठी महाडिक बंधूंनी तयारी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.तथापि ऐनवेळी महाडिक दुसºयांना देतात, त्या कुबड्यांचा भाव वधारतो की काय, अशीही चर्चा मतदारसंघातील राजकीय वर्तुळातून आहे.
आमदार जयंत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्यासह महापालिका निवडणूक, इस्लामपूर, जत, आष्टा, शिराळा आदी पालिका निवडणुकीत आम्ही मदत केली आहे. आता लढायचे ठरवले आहे. आमच्या कुबड्या घेऊन काही नेते राजकारणात तरले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम्हाला मदत करावी अन्यथा याच कुबड्यांचा उलटा प्रयोग करू.- राहुल महाडिक, विरोधी गटनेते, वाळवा पंचायत समिती.