इस्लामपूर : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील बहुतांशी नेत्यांत अस्वस्थता पसरली असून, ती अद्यापही कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नानासाहेब महाडिक यांच्यासह काही नेते भाजपच्या वाटेवर होते. परंतु आता महाडिक यांनी हा निर्णय बदलला असून, ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तथापि सध्या त्यांनी हा निर्णय स्थगित ठेवून सावध भूमिका घेतली आहे. वाळवा-शिराळा तालुक्यातील महायुतीतील सर्वच घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊनच महाडिक यांच्या पक्षप्रवेशाविषयी अंतिम निर्णय होईल, असे स्पष्ट मत खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार निवडण्यासाठी महायुतीत चाचपणी सुरू आहे. परंतु महायुतीतील नेत्यांत ताळमेळ नसल्याने तो मेळ घालण्यासाठी खा. राजू शेट्टी यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या घडामोडींअगोदरच महाडिक यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. परंतु काही राजकीय सल्लागारांनी त्यांना, सध्या थंड घ्या, नंतरच निर्णय घ्या, असा सल्ला दिल्याचे समजते. त्यामुळे महाडिक गटाने सध्या सावध भूमिका घेत महायुतीची बैठक होईपर्यंत वाट पाहणे पसंत केले आहे. (प्रतिनिधी)
महाडिकांचा शिवसेना प्रवेश लांबणीवर
By admin | Published: July 12, 2014 12:13 AM