लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विधानसभेच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीची गाडी ग्रामपंचायत निवडणुकीत रुतली. स्थानिक राजकारणापुढे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी हात टेकल्याने हा प्रयोग ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी होऊ शकला नाही.
जिल्ह्यात सध्या १५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याबाबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. जिल्ह्यातील नेत्यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्नही केले, मात्र स्थानिक पातळीवरील हेवेदावे, राजकारण यापुढे नेत्यांचा निभाव लागला नाही.
जिल्ह्यातील आजवरचा अनुभव असाच आहे. पक्षीय स्तरावर या निवडणुका होत नाहीत. सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत कोणत्या नेत्याच्या प्रभावाखाली सत्ता आली आणि तो नेता कोणत्या पक्षाच आहे, त्यावर ग्रामपंचायतींमधील बलाबल ठरविले जाते. प्रत्येक तालुक्यात हे चित्र वेगवेगळे आहे. काहीठिकाणी सर्वच पक्ष स्वतंत्र लढतात, तर काहीठिकाणी जमेल तशी सोयीने युती करुन पॅनेल अस्तित्वात येत असते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्तेच याबाबतचा निर्णय घेत असतात. बऱ्याचदा जिल्हास्तरावरील नेतेही त्यांच्या सुरात सूर मिसळून शांत राहणे पसंत करतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दल सुरुवातीपासूनच साशंकता व्यक्त केली जात होती. काहीठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला असला तरी बहुतांश ठिकाणी तो फसला आहे. एखाद्या गावात राष्ट्रवादीची ताकद असेल तर तो आघाडीतील अन्य तो पक्षांना सोबत घेण्यास तयार होत नाही. असे चित्र सर्वत्र दिसून येते.
चौकट
निकालानंतर महाआघाडीचा खराखुरा चेहरा समोर येणार
महाविकास आघाडीतील सर्व पक्ष स्वतंत्र लढत असले तरी निकालानंतर सत्ता स्थापन करताना गरज पडल्यास हे पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यामुळे असा प्रयोग किती ठिकाणी यशस्वी झाला, याचे चित्र समोर येऊ शकेल. काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपला सत्ता स्थापनेसाठी एखाद्या गटाची गरज पडली तर त्याठिकाणी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षाला ते सोबत घेऊ शकतील.
चौकट
निकालानंतर चित्र बदलले
सध्या प्रत्येक पक्ष ताकदीने निवडणूक लढवित आहे. निकालानंतर सत्तास्थापनेवेळी चित्र पूर्ण बदलणार आहे. काहीठिकाणी सत्तांतर होईल, काहीठिकाणी सत्ता अबाधित राहिल, तर काहीठिकाणी सत्तेची समीकरणे बदलतील. महाविकास आघाडी काहीठिकाणी स्वतंत्र लढून सत्तेत येईल तर काहीठिकाणी त्यांच्यात फुटही पडेल, असे चित्र दिसते.
कोट
सर्वचठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग फसलेला नाही. काहीठिकाणी आघाडी झाली आहे. यासाठी आम्ही प्रयत्न केले. गावपातळीवरच्या निवडणुका या पॅनेलच्या माध्यमातून लढल्या जातात. त्यामुळे बऱ्याचदा त्या पक्षविरहित होतात.
- अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
कोट
गावपातळीवरही महाविकास आघाडीचा प्रयत्न यशस्वी व्हायला हवा. गावपातळीवरच्या राजकारणावर तालुक्याचे व पर्यायाने जिल्ह्याचे राजकारण अवलंबून असते. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुका लढताना या एकसंध आघाडीमुळे समन्वय राखून यश मिळवता येते.
- आ. मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
कोट
ज्याठिकाणी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे प्राबल्य आहे, तिथे शिवसेनेला डावलले गेले. शिवसेनेचे पारडे जड होऊ नये याची दक्षता अनेकठिकाणी मित्रपक्षांनी घेतली. त्यामुळे प्रयोग यशस्वी झाला नाही. शिवसेनेची ताकद त्यांनी ओळखली नाही. बिनविरोध झालेल्या ११ पैकी ५ ग्रामपंचायती आमच्या आहेत.
- संजय विभुते, जिल्हाप्रमुख, शिवसेना