सांगली : थकीत कर्जापोटी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने डिसेंबरमध्ये कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला असताना, बँक आॅफ इंडियानेही ४८ कोटीच्या थकबाकीपोटी महांकाली कारखान्याचा ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महांकाली कारखान्याच्या थकीत कर्जवसुलीसाठी दोन्ही बँका आमने-सामने आल्या आहेत.बँक आॅफ इंडियाच्या कवठेमहांकाळ शाखेमार्फत महांकालीला कर्जपुरवठा करण्यात आला होता. कारखान्याकडे सध्या ४८ कोटी ७३ लाख ६५ हजार ५२४ रुपये थकबाकी आहे. या थकबाकीपोटी बँकेने कारखान्यास १२ एप्रिल २0१९ रोजी सिक्युरिटायझेशन अॅक्टअंतर्गत नोटीस बजावली होती.
त्यास प्रतिसाद न मिळाल्याने बँक आॅफ इंडियाने १६ जानेवारी २0२0 रोजी कारखान्याच्या मालमत्तांचा ताबा घेतल्याची नोटीस गुरुवारी प्रसिद्ध केली. या मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असे बँकेने म्हटले आहे.दुसरीकडे महांकाली साखर कारखान्याला जिल्हा बॅँकेने १३८ कोटी ५३ लाख ९५ हजार रुपयांच्या थकीत कर्जवसुलीसाठी २८ आॅगस्ट २०१९ रोजी मागणी नोटीस बजावली होती.कारखान्याच्या कार्यकारी संचालकांसह संचालक अनिता विजय सगरे, दीपक ओलेकर, आदगोंडा पाटील, किसन पोटोळे, आप्पासाहेब कोळेकर, हणमंत शिंदे, संभाजी पाटील, पुंडलिक पाटील, सुभाष पाटील, शिवाजी कोळेकर, कोंडीबा हारगे, जीवन भोसले, बाळासाहेब ओलेकर, गणपती सगरे, रामचंद्र जगताप, पद्मिनी कुणूरे, शशिकला पाटील, रूद्रगोंडा पाटील, तानाजी भोसले यांना बॅँकेने नोटीस बजावून, ६० दिवसात थकबाकी भरण्यास सांगितले होते. पण मुदतीत त्यांनी थकबाकी न भरल्याने कारखान्यासह स्थावर व जंगम मालमत्तेचा जिल्हा बँकेने सोमवारी प्रतिकात्मक ताबा घेतला.अन्य कोणत्याही बॅँका व वित्तीय संस्थांनी महांकाली कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व्यवहार करू नये, केल्यास त्यांच्यावर जिल्हा बॅँकेचे थकीत कर्ज फेडण्याची जबाबदारी राहील, अशी नोटीस प्राधिकृत अधिकारी एम. बी. पाटील यांनी दिली आहे.