सांगली : पुणे, मुंबईला जाण्यासाठी सांगलीकरांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसला सर्वाधिक पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या गाडीने सांगली स्थानकाला १० महिन्यांत तब्बल पावणेदोन कोटी रुपये मिळवून दिले आहेत. प्रवाशांच्या पसंतीमध्ये महाराष्ट्र एक्स्प्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे.सांगली रेल्वे स्थानकाने प्रवासी वाहतुकीतून १० महिन्यांत एकूण सहा कोटी रुपये उत्पन्न मिळवले. येथून धावणाऱ्या प्रत्येक गाडीने सरासरी ४.२५ लाख रुपये उत्पन्न मिळवून दिले. प्रत्येक फेरीसाठी १२ हजार रुपयांची मिळकत केली. १ एप्रिल २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ या दहा महिन्याच्या कालावधीतील प्रवासी वाहतुकीतून मिळालेलया उत्पन्नाची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.महालक्ष्मी एक्सप्रेसच्या १० महिन्यात ३०५ फेऱ्यासांगलीतून मुंबईकडे महालक्ष्मी एक्स्प्रेसने १० महिन्यांत ३०५ फेऱ्या केल्या. त्यातून १ कोटी ७४ लाख ९१ हजार ४८० रुपये मिळवून दिले. प्रत्येक फेरीने सरासरी ५७ हजार ३४९ रुपये कमाई केली.‘कोल्हापूर-गोंदिया’ही सुसाटमहालक्ष्मी एक्सप्रेस खालोखाल कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस कमाईत फायद्याची ठरली. तिने १० महिन्यांत २८४ फेऱ्यांतून १ कोटी ३९ हजार ४० रूपये मिळवून दिले. प्रत्येकी फेरीतून सरासरी ३५ हजार ३४९ रूपये उत्पन्न मिळाले.या गाड्यांनाही पसंती, मिळाले चांगले उत्पन्न
- कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेसलाही सांगलीकरांचा प्रतिसाद चांगला आहे. ४४ फेऱ्यांसाठी २१ लाख ६२ हजार ३४४ रुपयांची तिकिटे विकली गेली असून प्रत्येक फेरीतून ४९ हजार १४४ रुपयांचा गल्ला सांगली स्थानकाने गोळा केला.
- कोल्हापूर-अहमदाबादने ४४ फेऱ्यांतून १५ लाख २१ हजार ४५ रुपये, तर वास्को-निजामुद्दीनने ३०६ फेऱ्यांद्वारे ९४ लाख २९ हजार २८६ रूपये उत्पन्न मिळवले.
- कोल्हापूर - मुंबई कोयना एक्स्प्रेसने २९९ फेऱ्यांतून तब्बल ७८ लाख ९९ हजार रूपये मिळवून दिले.
- म्हैसूर-निजामुद्दीन, बेंगळुरू- गांधीधाम, हुबळी- दादर, म्हैसूर- दादर शरावती एक्स्प्रेस यांनाही सांगलीकर गर्दी करत असल्याचे दिसते.