लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी शुक्रवारी मिरज जंक्शनला भेट देऊन स्थानकाची पाहणी केली. कोरोना साथीमुळे बंद केलेली कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मिरज- कोल्हापूर, मिरज- पुणे, मिरज- बेळगाव, मिरज- पंढरपूर या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याबाबत त्यांनी भाष्य केले नाही.
खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे यांनी महाव्यवस्थापकांना प्रवासी सुविधांसह विविध मागण्यांचे निवेदन दिले.
महाव्यवस्थापकांच्या पाहणी दौऱ्यासाठी गेले दोन महिने रेल्वे प्रशासनाची तयारी सुरू होती. मिरज स्थानकात प्लॅटफॉर्म व स्थानक परिसर चकाचक करण्यात आला होता. रेल्वे अधिकारी व कर्मचारी गणवेशात उपस्थित होते. सकाळी १० वाजता जीएम स्पेशल रेल्वे मिरज स्थानकात दाखल झाली. महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्यासोबत मिरज रेल्वेस्थानकातील विद्युतीकरण, पादचारी पूल, रनिंग रूम, लिफ्ट, प्रतीक्षालय, स्थानकातील इतर विकासकामांची पाहणी केली. रेल्वे कर्मचाऱ्यांना सिग्नल यंत्रणा कीटचे वाटप केले. खासदार संजय पाटील व आमदार सुरेश खाडे यांनी गेले नऊ महिने बंद असलेल्या एक्स्प्रेस व पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. महालक्ष्मी एक्स्प्रेस पुढील महिन्यात सुरू होत असल्याचे मित्तल यांनी सांगितले. मात्र, पॅसेंजर गाड्यांबद्दल त्यांनी बोलणे टाळले. मित्तल यांना विविध पक्ष संघटनांतर्फे मिरज स्थानकात आरक्षण तिकीट बुकिंग काउंटर वाढविणे, पिटलाइन वाढवणे, पॅसेंजर गाड्यांची संख्या वाढविणे यासह मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
चाैकट
स्थानकात प्रवेशबंदी
महाव्यवस्थापक रेल्वे अधिकाऱ्यांच्या ताफ्यासोबत स्थानकात पाऊण तास उपस्थित होते. निवेदन देण्यासाठी आलेल्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना रेल्वे सुरक्षा दलाने स्थानकाच्या प्रवेशद्वारातच अडविल्याने वादावादी झाली. पत्रकारांनाही स्थानकात प्रवेशबंदी करण्यात आली होती.