प्रताप महाडीक कडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज, मंगळवारी भारती विद्यापीठाच्या अमरापूर तालुका कडेगाव येथील अभिजीत दादा कदम प्रशाला येथे ५२० विद्यार्थ्यांनी आपल्या वाचनातून "ग्रंथ हेच गुरु' हा संदेश दिला आहे. यावेळी ३५०० चौरस फुटामधून तब्बल ३२२१ वह्या व पुस्तकांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य अशी जगातील पहिली कोलाज प्रतिमा साकारत महामानवास अनोखे अभिवादन केले. १९०७ साली मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर बाबासाहेबांच्या सत्कार प्रसंगी त्यांना भेट म्हणून त्यांचे शिक्षक कृष्णाजी केळुस्कर यांनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र हे पुस्तक भेट दिले, हेच पुस्तक त्यांना त्यांच्या जीवनात प्रेरणा देणारे ठरले. रोज १८ तास अभ्यास करणारे व पुस्तकांसाठी भव्य घर बांधणाऱ्या महामानवाने आपले आयुष्य पुस्तके लिहिण्यात आणि वाचनात खर्च केले. अशा या महामानवास कलाशिक्षक नरेश लोहार यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.यासाठी कलाशिक्षक लोहार यांना विद्यालयाचे प्राचार्य डी एम मोरे, सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच इयत्ता सातवी व नववीतील विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य मिळाले. दोन दिवस उन्हातान्हात उभे राहून पूर्ण केली कलाकृती ही कोलाज प्रतिमा साकारत असताना कलाशिक्षक नरेश लोहार यांनी विद्यार्थ्यांसमवेत दोन दिवसात तब्बल १५ तास भर उन्हात उभे राहून ही कलाकृती परिपूर्ण केली आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी एक उत्तम कला जोपासावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
Mahaparinirvan Din 2022: सांगलीतील अमरापुरात महामानवास अनोखे अभिवादन, वह्या व पुस्तकांमधून साकारली कोलाज प्रतिमा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 6:29 PM