इस्लामपूर : जितके पैसे पुजले जातील, त्याच्या दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत कापूरवाडी (ता. वाळवा) येथील जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटला गंडा घालण्यात आला. एजंटाच्याच घरात पाटावर ५ लाख रुपये पूजेसाठी मांडून पूजा झाल्यावर ते घेऊन भामट्या महाराजाने धूम ठोकली. पैशाचा पाऊस पाडण्याची ही घटना शनिवारी दुपारी घडली.याबाबत पांडुरंग शिवराम सावंत (वय ४५, कापूरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेशगिरी महाराज उज्जैन (पूर्ण पत्ता नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सावंत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. वर्षभरापूर्वी त्यांची माणिकवाडी येथील संतोष शिवाजी जाधव याच्याशी ओळख झाली होती. ऑगस्ट २२ मध्ये संतोष जाधव याने सावंत यांना शेगाव (जि. बुलढाणा) येथे राजू पवार नावाचा महाराज आपण दिलेल्या पैशाची पूजा करतो आणि आपण जेवढे पैसे ठेवू त्याच्या दुप्पट परत देतो अशी माहिती दिली.त्यानंतर सप्टेंबरमध्ये सावंत आणि जाधव हे दोघे शेगाव येथे गेले. तेथे पवारने उज्जैनच्या गणेशगिरी महाराजांनी पैसे पुजल्यावर तुमची भरभराट होईल, पैसा वाढेल अशी बतावणी केली. गणेशगिरी महाराजाशी सावंत यांचा मोबाइलवर संपर्क करून दिला. त्यावेळी सावंत आता पैसे नसल्याचे सांगत माघारी आले. मात्र, गणेशगिरी महाराज हा सातत्याने त्यांच्या संपर्कात होता. त्याने ‘वेळ चाललेली आहे, लवकरात लवकर पैसे पूजन घ्या, त्यासाठी ७ लाख रुपये लागतील’ असा निरोप दिला. सावंत यांनी आपल्याकडे ‘पाच लाख रुपये आहेत’ असे सांगितल्यावर ‘चालेल’ म्हणून महाराजाने पूजेची तयारी दर्शविली.शनिवारी दुपारी १२.४५ वाजता गणेशगिरी महाराज इस्लामपुरात आला. तेथून सावंत त्याला कापूरवाडीतील घरी घेऊन आले. काही वेळाने आतील खोलीत त्याने पूजेच्या साहित्यासह पाटावर ५ लाख रुपये ठेवून पूजा मांडली. सावंत यांना ‘बाहेरच्या खोलीत बसा, आत आला तर पूजेचा भंग होईल’ अशी भीती घातली. आतील पूजेचा फार्स उरकल्यावर ५ लाख रुपये त्याने उचलले. ‘मी बाहेर जाऊन परत येत आहे तोपर्यंत तुम्ही इथून हलायचे नाही’ असे सांगत त्याने सावंत यांच्या डोळ्यादेखत धूम ठोकली. बराच वेळ झाला तरी महाराज परत न आल्याने सावंत यांनी आतील खोलीत जाऊन पाहिले असता रक्कम नसल्याचे दिसून आले. त्यांनी रविवारी पोलिसांत तक्रार दिली
दुप्पट पैशाचे आमिष, महाराजाने सांगलीतील कापूरवाडीमधील एकाला घातला ५ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 12:51 PM