कामेरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आश्वासनांच्या पुड्या सोडण्याचे काम केले आहे. म्हणे ते लंगोट नेसून उभे आहेत आणि पैलवान नाही. कुस्ती आणि मातीतला पैलवान काय असतो, हे त्यांनी आजवर पाहिलेले नाही. त्यांनी एकदा त्यांचा तेल लावलेला आणि लंगोट घातलेला फोटो काढून टाकावा म्हणजे कळेल, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मारला.कामेरी (ता. वाळवा) येथे शिराळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी व काँग्रेसचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आ. पाटील म्हणाले, देशात मोदी, शहा यांनी चालविलेली हुकूमशाही व राज्यातील पेशवाई दूर करण्यासाठी मानसिंगराव नाईक यांना विजयी करावे.
या मतदार संघातील विद्यमान आमदारांची वाईट परिस्थिती असतानाही, त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. आमचे साडू सत्यजित देशमुख यांना वाटत होते, त्यांना भाजप उमेदवारी देईल. मात्र त्यांना ती दिली नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या मतदार संघातील शिवाजीराव नाईक यांचा पराभव होत नाही, तोपर्यंत त्यांना उमेदवारी मिळणार नाही.
मानसिंगराव नाईक म्हणाले, विद्यमान आमदार यांनी लोकांचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत. त्यांचा दारुण पराभव करण्यासाठी जनता मतदानाची वाट बघत आहे.सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, बी. के. नायकवडी, छायाताई पाटील, राहुल मोहिते, अॅड. रवी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी देवराज पाटील, विजय पाटील, जगदीश पाटील, भीमराव पाटील, संजीव पाटील, छगन पाटील, अरुण कांबळे, शिवाजीराव साळुंखे, सुनीता देशमाने उपस्थित होते.