दत्त पाटीलकवठेमहांकाळ -आता नाही, तर कधीच नाही, याच भूमिकेतून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी तयारी चालविली आहे. निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी मतदारसंघातील गावांना थेट भेट दिली.तासगाव तालुक्यात आमदार सुमनताई पाटील यांची, तर कवठेमहांकाळ तालुक्यात अजितराव घोरपडे सरकारांची हवा असल्याचे दिसून नेते. वर्षानुवर्षांचा पाणीप्रश्न आणि नेत्यांचा जनसंपर्क, हाच कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे चित्र मतदारसंघात आहे. राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या पश्चात पहिल्यांदाच आबा गट विरोधकांशी दोन हात करत स्वत:ची ताकद अजमावत आहे.कदाचित ही निवडणूक सुमनतार्इंसाठी शेवटची ठरणारी असली तरी, युवा नेते रोहित पाटील यांचा राजकीय पाया निश्चित करणारी ठरणार आहे. अखेरच्याक्षणी भाजपला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री अजितराव घोरपडे शिवसेनेकडून रिंगणात उतरले. राजकीय मर्यादा असल्याने भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यावर भिस्त ठेवून त्यांनी शड्डू ठोकला.तासगाव तालुक्यातील बहुतांश गावात आमदार सुमनतार्इंची हवा असल्याचे दिसून आले. पाच वर्षात आमदार सुमनतार्इंकडून झालेली विकासकामे आणि जनसंपर्क यामुळे यंदा त्याच असल्याचे मतदारांकडून सांगितले जात आहे. यंदा आमच्याकडं आबाचंच वारं दिसतंय. घोरपडे सरकार इकडं कधी फिरकलं नाहीत. त्यामुळं इकडं ते जास्त चालणार न्हाईत. असं सिध्देवाडीचे आण्णू पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, सिध्देवाडीचा मोठा तलाव हाय, पर पाणी न्हवतं. पाण्यासाठी खासदारास्नी मतं दिली. पण कुणीच पाणी दिलं न्हाय. शेवटी निसर्गानंच तलाव भरून दिलाय. आमदार सत्तेत न्हायीत, पर ज्यांच्या हातात सत्ता हाय त्यांनी बी पाणी दिलं न्हाय.तासगाव तालुक्यातून कवठेमहांकाळ तालुक्यात घाटनांद्रेत प्रवेश केला. गावातच पारावर काही मंडळींची बैठक बसली होती. टेंभूच्या पाईप लोकसभा निवडणुकीआधी येऊन पडल्यात. मात्र पाण्याचा प्रश्न मिटला नाही. गावात प्रचाराच्या गाड्या येतात, पण उमेदवार आले नसल्याचेही काहींनी सांगितले.
कुणीबी आलं तरी पाणी काय मिळत न्हायह्ण अशा मानसिकतेतून निरुत्साह असल्याचे चित्र दिसून आले. सरकार जास्त फिरकलं नाहीत, आमदारबी आल्या नाहीत. पण आबानं केलेल्या कामाच्या जोरावर आबा गटच जास्त चालंल असं पतंगराव शिंदे यांनी सांगितले.सरकार आलं तर पाणी यील, अशी प्रतिक्रिया कुंडलापूरच्या उदय पाटील यांनी दिली. कवठेमहांकाळजवळ वाटेतच शिंदेवाडीचे सरपंच भेटले. यंदा सरकारांना निवडून आणायचंच, यासाठी आम्ही तासगाव तालुका पिंजून काढला आहे. मणेराजुरीत ठाण मांडले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.तासगाव तालुक्यात आमदार सुमनताई पाटील यांचा जनसंपर्क, कवठेमहांकाळ तालुक्यात आर. आर. पाटील यांनी केलेली विकासकामे आणि रोहित पाटील यांचा प्रभाव, या भरोशावर राष्टÑवादीला मतदान करणार असल्याचा सूर आहे.
दुसरीकडे खासदार आणि सरकार मिळून मतदारसंघाचा कायापालट करतील. सरकारांची आमदारकी हा कवठेमहांकाळच्या अस्मितेचा विषय आहे. या मुद्द्यावर घोरपडेंना मतदान करण्याचा सूर आहे.