Maharashtra Assembly Election 2024 : सांगली : राज्यभरात दिवाळीसह विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.विविध पक्षांचे उमेदवार मतदारांना घरोघरी भेटी देऊन दिवाळीच्या शुभेच्छा, तसेच फराळ देत आहेत. अशातच तासगाव शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटल्याचा आरोप अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता.
याप्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त भरारी पथकाने कारवाई केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दोन कार्यकर्ते सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटप करत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल तासगाव येथील साठे नगर भागात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटील यांची पदयात्रा सुरू होती. या पदयात्रेच्या पाठीमागे रोहित पाटलांचे काही कार्यकर्ते फराळाच्या बॉक्समधून पैसे वाटत असताना निदर्शनास आले. यानंतर संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी या रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले.
याप्रकरणी चौकशी केली असता रोहित पाटलांच्या या कार्यकर्त्यांनी मतदारांना फराळाचा एक बॉक्स आणि तीन हजार रुपयांचे आमिष दाखवून आदर्श आचारसंहितेचा भंग केला . त्यामुळे तासगाव पोलिसांनी पूर्ण चौकशी व तपास करून रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांविरोधात फिर्याद दाखल करून घेतली. या प्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.