Maharashtra Assembly Election 2024 : तासगाव (जि. सांगली) : माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला. त्याच्या खुल्या चौकशीसाठीच्या फाइलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ही फाइल मला दाखवली. आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापण्याचा प्रयत्न केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे केले.
प्रचारसभेत ते म्हणाले, २०१४च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच राष्ट्रवादीने भाजपला विचारधारा सोडून बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिला. राष्ट्रवादीची स्थापना सोनिया गांधींना विरोधातून झाली. मात्र लगेच १९९९ मध्ये काँग्रेससोबत सरकार स्थापन केले, हे कसे काय चालते, हा प्रश्न आहे. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
...तर आर. आर. मुख्यमंत्री झाले असतेमुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर आर. आर. पाटील यांनी राजीनामा देऊन अंजनी गाठली; पण याची कल्पना मला दिली नाही. त्यानंतर त्यांना मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष केले. २००४ मध्ये राज्यात आपले सर्वाधिक आमदार होतील, अशी पैज लागली होती, ती त्यांनी जिंकल्यानंतर मी त्यांना पैजेपोटी महागडी स्कोडा गाडी दिली. त्याच वेळी ते मुख्यमंत्री झाले असते; पण मुख्यमंत्रिपदावरील दावा पवार साहेबांनी का सोडला हे माहिती नाही, असे अजित पवार म्हणाले.
आबांचा मुलगा म्हणाला... आर. आर. आबा प्रामाणिकपणे, स्वच्छपणे काम करत होते. आबांना जाऊन साडेनऊ वर्षे झाली. आज त्यांच्यावर आरोप झाले, ते पाहून अतिशय दु:ख झाले. अजित पवार ज्येष्ठ आहेत. त्यांनी जे आरोप केले, ते कुटुंब म्हणून वाईट वाटले. आबा हयात असते तर आबांनी त्याला उत्तर दिले असते. या वक्तव्याच्या विरोधात जनता उत्तर देईल, या शब्दात आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.