जयश्रीताईंना फितवणाऱ्याची खैर नाही; विश्वजीत कदम: सांगलीत पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार प्रारंभ
By अशोक डोंबाळे | Published: November 8, 2024 10:23 PM2024-11-08T22:23:33+5:302024-11-08T22:24:05+5:30
आमदार विश्वजीत कदम यांनी शुक्रवारी सांगलीतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली: जयश्री मदन पाटील सरळमार्गी, भोळ्या आहेत. त्यांना बंडखोरी करण्यासाठी फितवलं गेलं. कुणी फितवलं याचं सत्य बाहेर येईल तेंव्हा त्याची खैर नाही हे लक्षात ठेवावं, असा इशारा देत आमदार विश्वजीत कदम यांनी शुक्रवारी सांगलीतीलकाँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडला.
सांगलीतील मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून मारुती मंदिरात प्रचार प्रारंभ झाला. यावेळी भारत जोडो अभियानाचे निमंत्रक योगेंद्र यादव, कर्नाटकचे आमदार बी. आर. पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, उध्वसेनेचे शंभोराज काटकर, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, दिलीप पाटील, अभिजित भोसले, हरिदास पाटील, संगीता हारगे, सचिन जगदाळे, मयूर पाटील, शेरू सौदागर, आशा पाटील, कविता बोंद्रे, उमेश देशमुख आदी उपस्थित होते.
विश्वजीत कदम म्हणाले, ‘‘जिल्ह्यात संकटातून काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. लोकसभेला गोंधळ झाला, पुन्हा विधानसभेला तेच. माझ्याकडं जादूची कांडी आहे का एका विधानसभेतून दोन उमेदवार द्यायला. माझं आत एक, बाहेर एक असं नसतं. जे आहे ते क्लिअरखट्ट. लोकसभा एकाला, विधान परिषद एकाला, विधानसभा एकाला सगळं ठरलं होतं. राहूल गांधींनी मला तो शब्द दिला होता. मला वाटलं असतं तर मी जत, पलूस कुठेही विधान परिषद देऊ शकलो असतो, मात्र मला सांगलीचा प्रश्न महत्वाचा होता. एक पाऊल मागे येऊन निर्णय घेणं गरजेचं होतं. पतंगरावसाहेबांना दोनवेळा उमेदवारी मिळाली नव्हती. वाट पहावी लागते, सांगलीत मात्र तसे झाले नाही. विशाल पाटलांची कोंडी झाली, जयश्रीताईंवर कसला दबाव होता माहिती नाही. मी तासन् तास बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. हात जोडून विनंती केली. आपणाला भाजपला हरवायचं आहे. महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत, ज्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता येणं गरजेचं आहे. त्यासाठी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘सांगलीच्या आखाड्यात एक भाजपचा आणि दुसरा भाजप पुरस्कृत उमेदवार आहे. एक भाजपची बी टीम आहे. मी खासदार विशाल पाटलांवर नाराज आहे. जेंव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्याची निवडणूक असते तेंव्हा त्यांना काँग्रेस एकसंध हवी असते, माझ्यासारख्या कार्यकर्त्याची वेळ येते तेंव्हा पक्षात फूट कशी पडते? ही फूट देवेंद्र फडणवीस यांनी ठरवून पाडली. साम, दाम, दंड, भेद वापरला. त्यांनी गुंड्या फिरवल्या म्हणून गाडगीळ पुन्हा मैदानात आले. अन्यथा, थेट एकास एक लढाईतून त्यांनी पत्र लिहून कधीच पळ काढला होता. मी पळणार नाही, मी सांगलीच्या मातीत जन्मलो, वाढलो. याच मातीत शेवटचा श्वास घेणार. तोवर सांगलीसाठी झटत राहणार.’’
संजय बजाज यांनी काँग्रेसचे इकडं-तिकडं गेलेले लवकर सोबत येतील, असा विश्वास व्यक्त केला. या सभेत माजी नगरसेवक मुन्ना कुरणे स्वगृही परतले.
विश्वजीत माझे श्रीकृष्ण
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘जयश्रीताई मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी विधानसभा जिंकल्यानंतर विश्वजीत यांच्या सोबत दिल्लीत जाईन तेंव्हा ताईंसाठी हट्टून विधान परिषद मागेन. जयश्रीताई तुमसे बैर नहीं, सुधीरदादा तुम्ही खैर नही. या महाभारतात माझी अवस्था अर्जुनासारखी आहे. या लढाईत विश्वजीत कदम माझ्यासाठी श्रीकृष्ण आहे, ते माझ्या रथाचे सारथ्य करत आहेत.