"इथं कशी अपेक्षा करता?" विरोधी पक्षनेतेपदाबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:48 PM2024-11-25T12:48:35+5:302024-11-25T12:50:16+5:30
सांगतील बोलताना अजित पवार यांनी विरोध पक्षापदाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं आहे. लोकसभ निवडणुकीत केवळ एक जागा मिळाल्यानंतर आता विधानसभेला अजित पवार यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून ५० आमदारांचाही आकडा गाठता आला नाही. त्यामुळे ६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधीपक्ष असणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच अजित पवार यांनी विरोध पक्षापदाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.
विधानसभेतील विजयानंतर कराडमधील प्रितिसंगम येथे असलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिली. यावेळेस माध्यमांनी त्यांना विरोधी पक्ष नेतेपदासंदर्भात प्रश्न विचारला. यावर अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांचीही भेट घेतली आणि त्यांना मिश्किल टोला लगावला. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यताही अजित पवारांनी फेटाळून लावली.
"निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांची यादी राज्यपालांना दिली आहे. आता तर आम्हाला बहुमत आहे. विरोधी पक्षनेता करता येणार नाही एवढ्या जागाही त्यांना मिळालेल्या नाहीत. तरीही आम्ही, मी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही विरोधकांचा मान-सन्मान ठेवण्याची पद्धत सुरु ठेऊ. विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपण सन्मान देतो. ते लोकांचे प्रश्न मांडतील आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करु. तसेच अधिकारी, आयपीएस अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊ. पाच वर्षात मजबुतीने चालणारं हे सरकार आहे. केंद्र सरकार साडेचार वर्ष चालणार. राज्य कसं सर्व क्षेत्रात आघाडीवर राहील याचा प्रयत्न करुन राज्य एक नंबरवर ठेऊ," असं अजित पवार यांनी म्हटलं.
यावेळी पत्रकरांनी अजित पवार यांना जरा मोठं मन दाखवून तुम्ही विरोधी पक्षनेता पद देणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी वर आभाळाकडे पाहत, "आमचं मोठं मन आता पार फुटायला लागलंय," असं म्हटलं. तसेच तुम्ही अगदी सोयीचं विचारता, केंद्रामध्ये ५४ च्या वर आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्षनेता पद मिळतं का? मग इथं कशी अपेक्षा करता?" असंही अजित पवार म्हणाले.