सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील ९९ उमेदवारांचा जाहीर प्रचार सोमवारी संपला. बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान असून, २५ लाख ३६ हजार ६५ मतदार सर्व राजकीय पक्ष, अपक्षांसह ९९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. आठ मतदारसंघांसाठी १५ हजार ४०९ अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले असून, दोन हजार ४८२ मतदान केंद्रांवर ते मंगळवारी तैनात होणार आहेत.जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत गेल्या महिन्याभरापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. जिल्ह्यातील मतदारांचा कौल आपल्या पारड्यात पाडण्यासाठी शिंदेसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आणि उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या महाविकास आघाडीनेही जोरदार प्रचार सभा घेतल्या आहेत.सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अपवादात्मक सभा वगळता प्रत्येक उमेदवाराने प्रत्यक्ष जाऊन मतदारांच्या भेटीवर भर दिला. काहीजणांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. प्रचाराची सांगता झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने मतदानासाठीची यंत्रणा गतिमान केली आहे. मनुष्यबळासह मतदान केंद्रांवर तांत्रिक सुविधा देण्यासाठीही त्यांची धावपळ चालू होती.
प्रशासकीय यंत्रणा सज्जविधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. जिल्ह्यात २५ लाख ३६ हजार ६५ मतदार आहेत. १२ लाख ८२ हजार २७६ पुरुष तर १२ लाख ५३ हजार ६३९ महिला मतदारांचा समावेश आहे. आठ विधानसभा मतदारसंघांतील दोन हजार ४८२ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. आतापर्यंत बहुतांशी जणांना मतदार स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. ज्यांना फोटो व्होटर स्लिप मिळालेली नाही, त्यांनी बीएलओंशी संपर्क साधून फोटो व्होटर स्लिप घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदारांना करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मतदान केंद्रेमतदारसंघ - केंद्रेमिरज - ३०७सांगली - ३१५इस्लामपूर - २९०शिराळा - ३३४पलूस-कडेगाव - २८५खानापूर - ३५६तासगाव-कवठेमहांकाळ - ३०८जत - २८७एकूण - २४८२
रोख रकमेसह तीन कोटींवर ऐवज जप्तविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून भरारी पथकाने एक कोटी नऊ लाख ७८ रुपयांची रोकड, ३० हजार ९४१.२० लिटरचा एक कोटी ८१ लाख रुपयांचा मद्याचा साठा, गांज्यासह तीन कोटी पाच लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांनी दिली.
महापालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांचे वेबकास्टिंगआठ विधानसभा निवडणुकीतील दोन हजार ४८२ मतदान केंद्रांपैकी १५०८ मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी प्रशासनाची ‘वेबकास्टिंग’च्या माध्यमातून नजर राहणार आहे. केंद्रांवरील मतदानाची सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट पाहता येणार आहे. त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील सर्वच मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
निवडणुकीतील ९,६८५ जणांचे मतदानजिल्ह्यात सोमवारपर्यंत नऊ हजार ६८५ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनी १२ डी अर्ज भरुन दिला होता. या मतदारांची तीन हजार ५५४ संख्या असून, तीन हजार ४४० मतदारांनी मतदान केले आहे.