Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज माघार घेण्यासाठी ४ नोव्हेंबर शेवटची मुदत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील काही मतदारसंघामध्ये बंडखोरी केली आहे. आता बंडखोरी केलेल्या नेत्यांना अर्ज मागे घेण्यासाठी समजावले जात आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. शिराळा विधानसभेतील भाजपा नेते सम्राट महाडिक यांनी अर्ज माघार घेण्याचे जाहीर केले आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपाने सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी दिली, त्यामुळे सम्राट महाडिक नाराज होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी सम्राट महाडिक यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर महाडिक यांनी कार्यकर्त्यांसोबत बोलून निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. आता महाडिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अर्ज माघार घेणार असल्याचे जाहीर केले.
'४ नोव्हेंबरला अर्ज माघार घेणार'
पत्रकार परिषदेत बोलताना सम्राट महाडिक म्हणाले, ४ नोव्हेंबरला मी माझा अपक्ष अर्ज माघार घेणार आहे. आम्ही त्याच दिवशी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. देवेंद्र फडणवीस हे माझा सन्मान राखतील, कोणत्याही गोष्टींची अपेक्षा न ठेवता पुन्हा महायुतीचे सरकार आले पाहिजे ही धारणा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची असली पाहिजे, म्हणून आम्ही माघार घेत आहे, असेही सम्राट महाडिक म्हणाले.
'विरोधकांचा पराभव करायचा आहे'
"मतदारसंघात काही दिवसापासून चर्चा सुरू होत्या, या चर्चांना आता आम्ही पूर्णविराम देत आहे. भारतीय जनता पार्टी आमचा परिवार आहे. परिवारात नाराजी असणे हा आमचा अधिकार आहे, वरिष्ठ पातळीवर मला मुंबईला बोलावून घेतले होते, त्या ठिकाणी चर्चा झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर उपस्थित होते. मी त्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांसोबत बोलून निर्णय घेतो असे सांगितले होते. महायुती सरकार पुन्हा एकदा राज्यात सत्तेत आले पाहिजे यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही गेली दोन दिवस कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत होतो. आता आम्ही निर्णय घेतला आहे, आता आमच्या विरोधकांचा पराभव आम्हाला करायचा आणि सत्यजीत देशमुखांचा विजय करण्याची मी जबाबदारी घेत आहे, असंही महाडिक म्हणाले.