सांगली : विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात राज्यातील नेतेमंडळी, उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू असताना कार्यकर्तेही काही कमी नाहीत. त्यांनी समाज माध्यमांवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात समाज माध्यमांवर कार्यकर्त्यांचा एकमेकांशी सामना सुरू असताना सुज्ञ मंडळी त्यांना मोलाचा सल्ला देत आहेत. राजकारणात नेते एकमेकांचे ‘गुप्त मित्र’ असतात आणि कार्यकर्ते ‘उघड शत्रू’ असतात अशी ‘पोस्ट’ सध्या चर्चेत आहे.‘राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो’ या वाक्याचा अनुभव अनेकदा येत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन वर्षांतील उलथापालथ बघितल्यानंतर हे वाक्य अधोरेखित झाले आहे. सध्या सर्वत्र निवडणुकीचा माहोल पाहायला मिळत आहे. दिवाळी संपल्यानंतर नेतेमंडळी, उमेदवार यांच्यातील राजकीय दिवाळी पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत प्रचाराचे फटाके फोडले जात आहेत. त्यामुळे मतदारसंघात त्याचा धुरळा उडाला आहे. नेत्यांबरोबर कार्यकर्तेही सरसावले आहेत. त्यांनी समाज माध्यमांवर व्यक्त होत ‘हम भी कुछ कम नही’ असे दाखवून देण्यास सुरूवात केली आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत कालचे राजकीय शत्रू आज मित्र बनल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नेत्यासाठी ‘काय पण’ अशा अविर्भावात वावरणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. रात्रीत आपला नेता राजकीय शत्रूशी हातमिळवणी करत असताना आपण मात्र उगीचच विरोधी नेत्याच्या कार्यकर्त्यांशी शत्रुत्व घेतोय, याची त्यांना जाणीव व्हायला लागली आहे.लोकसभा निवडणुकीत ‘मिरज पॅटर्न’ चर्चेत आणणारे नेते यंदा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे गेले. कवठेमहांकाळला माजी खासदार संजयकाका पाटील यांना विरोध करणारे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी विधानसभेला संजयकाकांचा प्रचार सुरू ठेवला आहे. जतमध्येही लोकसभेच्या उलट विधानसभेला चित्र दिसत आहे. खानापूर-आटपाडीत अशोक गायकवाड यांनी शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला. इतर ठिकाणीही असेच चित्र दिसत आहे. त्यामुळे नेते एकमेकांचे ‘गुप्त मित्र’ आणि कार्यकर्ते मात्र ’उघड शत्रू’ असतात हे अधोरेखित झाले आहे.
सध्या समाज माध्यमांवर काही कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या समर्थनासाठी एकमेकांशी भिडले आहेत. परंतु, त्यांचे नेते कधी एकत्र येतील हे ते देखील सांगू शकत नाहीत. त्यांना जागृत करण्यासाठी सुज्ञ मंडळी सल्ला देत आहेत. परंतु, त्यांचा सल्ला ऐकतील ते कार्यकर्ते कसले? असा अनुभव येत आहे.नेते बाजूला, कार्यकर्त्यांची उणीदुणीसांगली परिसरातील एका पक्षातील कार्यकर्त्यांची समाज माध्यमांवर चांगलीच जुंपली आहे. सुरूवातीला आपापल्या नेत्याचे समर्थन करून दुसऱ्याच्या नेत्यावर टीकाटिप्पणी सुरू होती. त्यानंतर आता त्यांच्यात वैयक्तिक वाद रंगला आहे. त्यातून एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. नेते बाजूला राहिले असून, कार्यकर्तेच समाज माध्यमावर हमरी-तुमरीवर आल्याचे दिसते.दिवसा मैदानात, रात्री समाज माध्यमावरदिवसभर नेत्यांचा प्रचार करायचा आणि सायंकाळनंतर समाज माध्यमावर विरोधकांच्या टीकाटिप्पणीचा समाचार घेत त्यांना उत्तर द्यायचे, असा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रचारही रंगलेला पाहायला मिळत आहे. सध्या नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच जास्त आक्रमक झाल्याचेही दिसत आहे.