सांगली : धक्कादायक निकालांची नोंद करत, महायुतीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली. आठपैकी पाच जागा महायुतीने तर तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. सर्वाधिक चार जागा जिंकत भाजप हा सांगली जिल्ह्याचा नवा बाहुबली ठरला. त्यामुळे सांगली, मिरजेसह विजयी मतदारसंघात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.सांगली, मिरज, जत व शिराळा या चार मतदारसंघांवर भाजपने विजयी झेंडा फडकवला. शिंदेसेनेने सुहास बाबर यांच्या माध्यमातून खानापूरची जागा राखण्यात यश मिळविले. मात्र, उद्धवसेनेला जिल्ह्यात खाते उघडता आले नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसला मागील निवडणुकीच्या तुलनेत प्रत्येकी एका जागेचे नुकसान झाले.महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ या दोन तर काँग्रेसला पलूस-कडेगाव या एकाच जागेवर विजय मिळविता आला. मात्र, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या मताधिक्यात मोठी घट नोंदविली गेली. त्यामुळे घटलेल्या मताधिक्याचा धक्काही त्यांना बसला.जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय निकाल असामतदारसंघ - विजयी उमेदवार - पक्ष - मताधिक्य
- सांगली - सुधीर गाडगीळ - भाजप -३६,१३५
- मिरज - सुरेश खाडे - भाजप - ४४,२७९
- जत - गोपीचंद पडळकर - भाजप - ३७,१०३
- शिराळा - सत्यजीत देशमुख - भाजप - २२,६२४
- इस्लामपूर - जयंत पाटील - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार - ११,९११
- तासगाव-कवठेमहांकाळ - रोहित पाटील - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार - २६,५७७
- पलूस-कडेगाव - विश्वजीत कदम - काँग्रेस - २८,८२५
- खानापूर - सुहास बाबर - शिंदेसेना - ७७,५२२
जयंतरावांचे मताधिक्य सर्वात कमी, सुहासचे सर्वाधिकजिल्ह्यात सर्वाधिक ७७ हजार ५२२ इतके मताधिक्य शिंदेसेनेचे सुहास बाबर यांना मिळाले, तर सर्वात कमी म्हणजे ११ हजार ९११ इतके मताधिक्य जयंत पाटील यांना मिळाले. आजवरच्या आठ निवडणुकांतील त्यांचे हे सर्वात कमी मताधिक्य नोंदले गेले.
विश्वजीत कदम यांचे मताधिक्यही घटलेविश्वजीत कदम यांना २०१९च्या निवडणुकीत १ लाख ५० हजार ८६६चे मताधिक्य होते. यंदा हे मताधिक्य २८ हजार ८२५ पर्यंत घटले. या ठिकाणी भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी जोरदार लढत दिली.
आबांचे पुत्र जिंकलेसंपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात यंदा आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय पाटील यांच्यात लढत झाली. यात आर.आर. पाटील यांचे पुत्र विजयी झाले.
जिल्ह्यात २०१४ ची पुनरावृत्तीजिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीला पाच तर युतीला तीन जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये नेमकी हीच परिस्थिती उलट होती. त्यावेळी सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. तरीही भाजपाला ४, शिवसेनेला एक, काँग्रेसला १, तर राष्ट्रवादीला २ जागा जिंकता आल्या होत्या. विशेष म्हणजे २०१४ मध्ये ज्या चार मतदारसंघात भाजपाला यश मिळाले होते, त्याच मतदारसंघात यंदाही भाजपाने बाजी मारली.
पिता-पुत्राकडून पराभवसंजय पाटील यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्याविरोधात नेहमीच निवडणूक लढवली. मात्र, त्यांना सतत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या पश्चात आबांचे पुत्र रोहित पाटील यांच्याशी झालेल्या लढतीतही ते पराभूत झाल्याने पिता-पुत्राकडून पराभूत होण्याची नोंद त्यांच्या कारकिर्दीत झाली आहे.