शरदचंद्र पवार पक्षाच्या मैदानावर उसण्या खेळाडूंसह राष्ट्रवादीची बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 05:12 PM2024-11-01T17:12:45+5:302024-11-01T17:15:50+5:30

तासगाव - कवठेमहांकाळ, इस्लामपूरला 'काकां'ना रोखण्यासाठी पुतण्याची खेळी

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Candidates of Ajit Pawar group against candidates of Sharad Pawar group in Tasgaon - Kawthe Mahankal and Islampur for assembly | शरदचंद्र पवार पक्षाच्या मैदानावर उसण्या खेळाडूंसह राष्ट्रवादीची बॅटिंग

शरदचंद्र पवार पक्षाच्या मैदानावर उसण्या खेळाडूंसह राष्ट्रवादीची बॅटिंग

दत्ता पाटील

तासगाव : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सांगली जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाताला फार काही लागले नाही. विद्यमान विधानसभेचे तीन आणि विधान परिषदेचे एक असे चार आमदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे सांगलीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मैदानावर भाजपकडून उसण्या (आयात) उमेदवारांना घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बॅटिंग सुरू केली आहे. त्यामागे सांगली जिल्ह्यात काकांच्या (शरद पवार) यांच्या पक्षाला रोखण्याची खेळी पुतण्याची आहे.

राज्यात दीड वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. फुटीनंतर सांगली जिल्ह्यातील चारही आमदार शरद पवार यांच्या सोबत राहिले. पक्षाच्या फुटीनंतर जिल्ह्यातून अजित पवारांना तगडा नेता मिळाला नाही. कालांतराने विटा येथील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी हातात घड्याळ बांधले. त्यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष केले. मात्र, विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच वैभव पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे विधानसभा निवडणूक जाहीर होइपर्यंत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व केवळ नावापुरतेच होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी अजित पवारांनी मिरजेतून इद्रीस नायकवडी यांना विधान परिषदेवर संधी दिली. महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात मागील विधानसभा निवडणुकीत तासगाव - कवठेमहांकाळ आणि इस्लामपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होते. ते स्वतःकडे घेतले. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नव्हता. भाजपमधून माजी खासदार संजय पाटील यांना तासगावमध्ये, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना इस्लामपूरमध्ये पक्षात घेऊन विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे.

लढतींना ‘काका विरुद्ध पुतण्या’ अशी किनार

पक्ष फुटीनंतर काकांना साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या विरोधातच भाजपच्या शिलेदारांना मैदानात उतरविले. या दोन्ही ठिकाणी उमेदवारांचा प्रचाराचा प्रारंभदेखील जाहीर सभा घेऊन केला. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असा सामना रंगला आहे. त्यामागे 'काका विरुद्ध पुतण्या' अशीच राजकीय किनार आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Candidates of Ajit Pawar group against candidates of Sharad Pawar group in Tasgaon - Kawthe Mahankal and Islampur for assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.