काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांची अनामत रक्कम जप्त, सांगली जिल्ह्यात डिपॉजिट जप्त झालेले उमेदवार किती..वाचा

By अशोक डोंबाळे | Published: November 25, 2024 06:24 PM2024-11-25T18:24:22+5:302024-11-25T18:24:50+5:30

अनामत रक्कम कधी जप्त होते ?

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Confiscation of deposit amount of rebel Congress candidate Jayshreetai Patil | काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांची अनामत रक्कम जप्त, सांगली जिल्ह्यात डिपॉजिट जप्त झालेले उमेदवार किती..वाचा

काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांची अनामत रक्कम जप्त, सांगली जिल्ह्यात डिपॉजिट जप्त झालेले उमेदवार किती..वाचा

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील ९९ उमेदवारांपैकी केवळ सहा पराभूत उमेदवारांची अनामत वाचली आहे. उर्वरित काँग्रेसच्या जयश्री पाटील, भाजपचे तम्मनगौडा रवी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र देशमुख या बंडखोर उमेदवारांची अनामत जप्त (डिपॉझिट) झाली. शासनाच्या खात्यामध्ये २० लाख ७५ हजार रुपयांची अनामत जमा होणार आहे.

लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ नुसार, संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठरावीक रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास विधानसभेला २५ हजार आणि आरक्षित मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची अनामत रक्कम निवडणूक आयोगाने ठरविली आहे.

उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात एकूण झालेल्या मताच्या एकषष्ठांश मते मिळणे गरजेचे आहे. उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाही, तर त्याची अर्ज भरताना जमा केलेली अनामत रक्कम शासनाकडे जमा होते. या सूत्रानुसार जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील ८३ पराभूत उमेदवारांना साधारण ३४ ते ३५ हजार मते मिळणे गरजेचे आहे.

या उमेदवारांचे डिपॉझिट वाचले..

सांगली विधानसभा मतदारसंघातील एकूण १४ उमेदवार रिंगणात उतरले होते. यापैकी काँग्रेसचे पराभूत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना ७६ हजार ३६३ मते मिळाल्यामुळे ते अनामत रक्कम वाचविण्यात यशस्वी झाले. पण, काँग्रेस बंडखोर जयश्रीताई मदन पाटील यांना ३२ हजार ६३६ मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या मतदारसंघातील उर्वरित ११ उमेदवारांचीही अनामत रक्कम जप्त झाली. 

खानापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वैभव पाटील यांची अनामत रक्कम वाचली असून, बंडखोर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह १२ उमेदवारांची अनामत जप्त झाली. जत विधानसभा मतदारसंघातही लक्षवेधी लढत झाली असून, तेथेही भाजप बंडखोर तमन्नगोडा रवी पाटील यांना १९ हजार १२० मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत जप्त झाली. अन्य आठ उमेदवारांचीही अनामत जप्त झाली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांतील ८३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे २० लाख ७५ हजार रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे.

अनामत रक्कम कधी जप्त होते ?

उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एकषष्ठांश म्हणजेच १६.३३ टक्के मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास, त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. याचा अर्थ असा की, ज्या उमेदवाराने २५,००० रुपये किंवा १०,००० रुपये रक्कम जमा केली असल्यास, त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणताही परतावा दिला जाणार नाही. उदाहरणार्थ- जर विधानसभेच्या जागेवर एकूण २,००,००० मते पडली, तर सुरक्षा ठेव वाचविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी एक-षष्ठांश मते मिळवावी लागतील. याचा अर्थ प्रत्येक उमेदवाराला ३३,३३२ पेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक आहे. २०२४ विधानसभा निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी जवळपास ८३.८३ टक्के उमेदवारांनी त्यांची अनामत रक्कम गमावली आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवार

मतदारसंघ - एकूण उमेदवार - अनामत जप्तची संख्या

  • मिरज १४ - १२
  • सांगली १४ - १२
  • इस्लामपूर १२ -   १०
  • शिराळा ०६ - ०४
  • पलूस-कडेगाव ११ - ०९
  • खानापूर  १४ - १२
  • तासगाव-क.महांकाळ १७ - १५
  • जत   ११ - ०९
  • एकूण  ९९ - ८३

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Confiscation of deposit amount of rebel Congress candidate Jayshreetai Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.