विश्वजीत कदम, शरद लाड यांचे अखेर मनोमिलन; काही दिवसांपासून रंगले होते मानापमान नाट्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 06:18 PM2024-11-06T18:18:50+5:302024-11-06T18:20:48+5:30
अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ
पलूस : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, शरद लाड हे पलूस येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात एकाच व्यासपीठावर दिसले. त्यांच्यात अखेर मनोमिलन झाल्याचे दिसून आले.
काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेल्या काही दिवसांपासून मानापमान नाट्य रंगले होते. विश्वजीत कदम व शरद लाड यांनी निवडणुकीतील प्रचार सहभागावरून वेगवेगळ्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही नेत्यांची समजूत घालत आघाडी धर्म पाळण्याची सूचना केली. यामुळे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसले.
अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ
आपण इतिहासाची पाने उघडायची थांबवली, तर पलूस तालुक्याचा विकास होईल. आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही विश्वजीत कदम यांनी सभेत दिली.
मी सुपरवायझर
दोन्ही नेत्यांचे आता मनोमिलन झाले आहे. यापुढे समस्या निर्माण होणार नाहीत. काही झाले, तरी मी सुपरवायझर बनून सर्वांची समजूत घालेन, असे जयंत पाटील यांनी सांगताच हशा पिकला.
लाड कुटुंब आत एक अन् बाहेर एक, असे राजकारण करीत नाही. जयंत पाटील जे आदेश देतील त्याप्रमाणे काम करू. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस एकत्र आल्यावर काय इतिहास घडतो, हे दाखवून देऊ. गाफील न राहता काम करायला हवे. आमचे कार्यकर्ते सर्व विसरून प्रामाणिक काम करतील. - शरद लाड, युवा नेते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष.