सांगली : जिल्ह्यात यंदा आठही मतदारसंघांतून आलेले विधानसभेचे निकाल व त्यांची आकडेवारी पाहता मतदारांनी सर्वाधिक मतांचे दान शिंदेसेनेच्या पदरात टाकले आहे. त्यांना ६१.१४ टक्के, भाजपला ५३.३६ टक्के तर अजित पवार गटाला ४४.०२ टक्के मतदान झाले.मागील निवडणुकीच्या तुलनेत महायुतीला मतांचे भरभरून दान मिळाले आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत कमालीची घट झाली आहे.जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत यंदा महायुतीकडून तीन व महाविकास आघाडीकडून तीन असे सहा प्रमुख पक्ष मैदानात होते. या सहा पक्षांना मतदारांनी दिलेला मतांचा कौल पाहिला तर महायुतीला मोठा फायदा झाला आहे. महायुतीला महाविकास आघाडीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेस व उद्धवसेना मतांच्या टक्केवारीत सर्वांत खाली दिसून येत आहेत.
कोणत्या पक्षाला किती टक्के मतदानपक्ष - सरासरी मतदान
- भाजप - ५३.३६
- शिंदेसेना - ६१.१४
- राष्ट्रवादी अ. प. - ४४.०२
- काँग्रेस - ४१.७
- राष्ट्रवादी श. प. - ४५.०५
- उद्धवसेना - ३६.९५
२०१९ च्या निवडणुकीतील मतांची टक्केवारी
- भाजप - ४१.५१
- शिवसेना - २७.२०
- राष्ट्रवादी - ५५.३४
- काँग्रेस - ५९.५६
अजित पवार गट चौथ्या स्थानीदोन्ही उमेदवार पराभूत होऊनही राष्ट्रवादी अजित पवार गटाला मतांच्या टक्केवारीत लाभ झाला. सहा पक्षांच्या मत टक्केवारीच्या क्रमवारीत अजित पवार गट चौथ्या स्थानी आहे. याउलट काँग्रेसने एक जागा जिंकूनही मतांच्या टक्केवारीत ते पिछाडीवर आहेत.
महायुती पन्नाशीपारमहायुतीमधील तिन्ही पक्षांना मिळालेले सरासरी मतदान ५२.८४ टक्के आहे. मागील निवडणुकीत युतीची टक्केवारी ३४.३५ इतकी होती. आघाडीला मागील निवडणुकीत ५७.४५ टक्के मतदान झाले होते. यंदा महाविकास आघाडीला ४१.२३ टक्केच मतदान झाले आहे. त्यांच्या टक्केवारीत १६.२२ टक्के घट नोंदली गेली. तर महायुतीच्या टक्केवारीत १८.४९ टक्के वाढ झाली आहे.
कोणत्या आमदाराला किती मतदान टक्केआमदार - मतदारसंघ - टक्के
- सुधीर गाडगीळ - सांगली - ४९.७६
- सुरेश खाडे - मिरज - ५६.७
- गोपीचंद पडळकर - जत - ५१.७२
- सुहास बाबर - खानापूर - ६१.१४
- विश्वजीत कदम - पलूस-कडेगाव - ५५.८८
- जयंत पाटील - इस्लामपूर - ५१.७२
- सत्यजित देशमुख - शिराळा - ५३.६१
- रोहित पाटील - तासगाव- क.म. - ५४.०९
दोन राष्ट्रवादीत, दोन सेनेत कोण भारी?यंदा जिल्ह्यात दोन राष्ट्रवादी व दोन शिवसेना गटांचा सामना झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदरात ४४.०२ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदरात ४५.०५ टक्के मतदान पडले. उद्धवसेनेला सर्वात कमी म्हणजे ३६.९५ तर शिंदेसेनेला सर्वाधिक ६१.१४ टक्के मतदान मिळाले.