दिलीप मोहिते विटा : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जनतेची मने विचलित करून महायुतीने ईव्हीएमला हाताशी धरून महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचे मोठे षडयंत्र रचले. तोच प्रयोग खानापूर मतदारसंघातही झाला असून या मतदारसंघातही तशाच प्रकारे मोठे षडयंत्र रचले. त्यामुळे ईव्हीएम हे यंत्र आहे की षडयंत्र? असा संतप्त सवाल उपस्थित करीत खानापूर मतदारसंघात झालेला विरोधी उमेदवाराचा विजय हा जनमताचा कौल नसून तो ईव्हीएम यंत्राचा कौल आहे, असे महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अॅड. वैभव पाटील यांनी विटा येथील पत्रकार परिषदेत सांगत निवडणूक प्रक्रियेबाबतच शंका उपस्थित केली.वैभव पाटील म्हणाले, खानापूर मतदारसंघाचा निकाल पहाता यात मोठे षडयंत्र रचले गेले आहे. माझ्या विरोधातील निवडून आलेले उमेदवारच मी दोन ते पाच हजाराने निवडून येणार असे सांगत होते. तेच ७८ हजाराने निवडून येत आहेत. हे आश्चर्यकारक आहे. निवडणूकीच्या काळातील एकूण वातावरण, मला मिळत असलेला प्रतिसाद, सर्व प्रकारे लोकांतून होत असलेला उठाव याचा विचार केला तर या मताधिक्यामुळे मीच मला मतदान केले आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.भविष्यात या देशात लोकशाही जीवंत ठेवायची असेल तर मतदान बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून खानापूरच्या निवडणूकीत अनेक जणांनी मला साथ दिली. मदत केली, पक्षानेही भरपूर सहकार्य केले. सर्व माझ्याबरोबरच असताना झालेला माझा पराभव हा ईव्हीएम यंत्राचा विजय म्हणावा लागेल. हा जनमताचा कौल नाही. तो ईव्हीएमचा कौल आहे. तो त्यांना मिळाला आहे. मात्र, या निकालाने जनतेचे प्रश्न सुटले की जनतेला प्रश्न पडले, असे मी या निकालाबाबत बोलताना म्हणत आहे.खानापूर मतदारसंघात निवडणूकीच्या सुरूवातीच्या काळात आमच्या जनशक्तीबरोबर धनशक्ती आहे, असे मला वाटत होते. परंतु, विरोधी उमेदवाराच्या धनशक्तीसोबत ईव्हीएम यंत्रही आहे. हे जनतेने पाहिले. परंतु, मी हरणारा वैभव पाटील नाही. पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी व जनतेनेही खचून जाऊ नये. हा विजय ईव्हीएम यंत्राचा झाला आहे. मी नव्या जोमाने पुन्हा उभा राहत आहे, असेही वैभव पाटील यावेळी म्हणाले.यंत्र म्हणून बघायचे की षडयंत्र राज्यात महाविकास आघाडीचे जे उमेदवार निवडून आले ते हजारपासून पंचवीस हजारापर्यंतच्या मतांनी आले. परंतु, महायुतीचे विजयी झालेले उमेदवार हे ४० हजारापासून लाखापर्यंतच्या मताधिक्यांनी आले. त्यामुळे निवडणूकीचा निकाल पहाता ईव्हीएमकडे यंत्र म्हणून बघायचे की षडयंत्र म्हणून बघायचे, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.
Vidhan Sabha Election 2024: जनतेचा नव्हे, तर..; खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत मोठे षडयंत्र, वैभव पाटील यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 5:52 PM