दिपक माळी
माडग्याळ : गेली पन्नास वर्षे जत तालुक्यातील जनता पाण्यासाठी संघर्ष करत आहे. आता कुठे तालुक्यातील ५० टक्के भागाला म्हैसाळ योजनेतून पाणी मिळाले आहे. अद्याप ६५ टक्के भाग दुष्काळी आहे. पन्नास वर्षांपूर्वी पाण्यावर सुरू झालेले तालुक्याचे राजकारण अद्याप त्याच मुद्द्याभोवती फिरत आहे.मतदारसंघातील जत व माडग्याळ येथे ग्रामीण रुग्णालय आहे. अनेक गावांत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी व पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. रुग्णालयात पुरेशी औषधे उपलब्ध नाहीत. अनेक गावांत शाळेच्या इमारती धोकादायक व पडण्याच्या अवस्थेत आहेत. अनेक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पशुवैद्यकीय दवाखाने आहेत, पण पशुवैद्यकीय अधिकारीच नाही. खासगी बोगस डॉक्टर पशुपालकांची लूट करत आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. काही गावांना जाण्यासाठी रस्ते नाहीत, जे आहेत त्यांना खड्डे पडून त्यांची चाळण झालेली आहे.
युवकांना व तरुणांच्या हाताला काम मिळत नसल्याने तालुक्यात गुन्हेगारी वाढलेली आहे. खून, चोरी, चंदनतस्करी, गांजा शेती व तस्करी, जुगार अड्डे, मटका अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. यावरही पोलिस खात्याचे नियंत्रण नाही, शासकीय कार्यालयातील सर्वसामान्यांची होणारी आर्थिक लूट तर शिगेला पोहोचलेली आहे. अनेक समस्या असताना लोकप्रतिनिधी मात्र केवळ निवडणुकीपुरते आश्वासन असल्याचे चित्र आहे.
नेते बदलले पण समस्या जेसे थे..अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला जत विधानसभा मतदारसंघ २००९ च्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेत खुला झाला. त्यानंतर झालेल्या २००९, २०१४ आणि २०१९ या प्रत्येक निवडणुकीत जतकरांनी नवीन आमदारांना संधी दिली. त्यानंतरही मतदारसंघातील पाणी, रस्ते, वीज व आरोग्याच्या मूलभूत समस्या ‘जेसे थे’ आहेत.
जत मतदारसंघाचे चित्रनिवडणूक - आमदार - पक्ष२००९ - प्रकाश शेडगे - भाजप२०१४ - विलासराव जगताप - भाजप२०१९ - विक्रमसिंह सावंत - काँग्रेस