अशोक पाटीलइस्लामपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना बांधले. त्यामुळे इस्लामपूरची लढतीत थेट माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या तुतारीला आव्हान निर्माण झाले आहे. ही खेळी त्यांचे पुतणे अजित पवार यांनी काकांच्या विरोधात केली आहे.इस्लामपूर मतदारसंघात महायुतीत वेगवेगळे गट आहेत. भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक व विक्रम पाटील असे तीन गट आहेत. तर शिंदेसेनेत आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी असे दोन गट आहेत. त्यातच भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत यांचा सवतासुभा आहे. यांच्यात एकमत आजही नाही. तरीसुद्धा अजित पवार यांनी जयंत पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन जयंत पाटील यांना आव्हान देण्याची खेळी केली.जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांनी मिनी गूळ पावडर निर्मितीचा मिनी कारखाना उभा करून राजकीय एन्ट्री केली आहे. जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची बांधणी सुरू आहे. महायुतीत जागा वाटपात विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार यांच्या विरोधात अजित पवार गटाने आपले उमेदवार दिले आहेत. इस्लामपूर मतदारसंघ शिंदेसेनेचा होता तरीसुद्धा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मतदारसंघावर दावा केला. तर शिंदेसेनेकडून आनंदराव पवार व गौरव नायकवडी यांनी उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, निशिकांत पाटील यांनी महायुतीची उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली आहे.
मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा डावअजित पवार यांनी भाजपच्या गोटात उमेदवारी देऊन शिवसेना आणि काकांच्या राष्ट्रवादीवर खेळी केली आहे. विशेषतः जयंत पाटील यांना मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा डाव महायुतीतून झाल्याची चर्चा आहे.