कडेगाव : राज्यभरात पडझड झाली असताना पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात मात्र काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी ३० हजार ६४ इतके मताधिक्य घेऊन हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी भाजप महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करून पलूस कडेगावचे 'विश्व' जिंकले. कडेगाव येथील आयटीआय इमारतीत शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत संग्राम देशमुख यांनी ४५६ मतांनी विश्वजित कदम यांच्यावर मतांनी आघाडी घेतली. पहिल्या १० फेऱ्यांत कडेगाव तालुक्यातील गावांचा समावेश होता. कडेगाव तालुक्यात विश्वजीत कदम यांनी ९ हजार ६६८ इतके मताधिक्य घेतले. त्यानंतर, ११ व्या फेरीपासून २१ व्या फेरीपर्यंत पलूस तालुक्यातील गावांचा समावेश झाला. पहिली फेरीवगळता अन्य सर्व फेऱ्यांमध्ये डॉ. कदम यांचे मताधिक्य वाढत राहिले. २१ व्या फेरीअखेर निकाल जाहीर झाला त्यावेळी विश्वजीत कदम यांचे २८ हजार ८४३ इतके मताधिक्य झाले. टपाली व सैनिकांच्या मतांमध्ये विश्वजित कदम यांनी १२२१ इतके मताधिक्याचा समावेश झाल्यानंतर त्यांनी अखेर ३० हजार ६४ इतके मताधिक्य मिळवले. त्यामध्ये पलूस तालुक्याने १९ हजार १७५ मताधिक्य देऊन विश्वजित कदम यांच्या विजयात मोलाचे योगदान दिले. निकालानंतर, निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले यांनी डॉ. विश्वजित कदम यांना प्रमाणपत्र दिले. यावेळी आमदार मोहनराव कदम,महेंद्र लाड यांचेसह कुटुंबीय उपस्थित होते.
विजयाची कारणे
- १२०० कोटींच्या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासकामे.
- आमदार अरुण लाड, शरद लाड यांनी दिला पाठिंबा, उद्धवसेनेची साथ
- शिक्षण व सहकार क्षेत्रातील संस्थात्मक जाळे
पराभवाची कारणे
- मागील दोन निवडणुका न लढल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची घडी विस्कटली.
- भाजपच्या सत्ताकाळात महागाई आणि बेरोजगारीची समस्या वाढली.
- लहान गावांमध्ये प्रचार सभांचा अभाव जाणवला.
उमेदवार :पक्ष व पडलेली मते
- डॉ.विश्वजित कदम : काँग्रेस : १ लाख ३० हजार ७६९
- संग्रामसिंह संपतराव देशमुख : भाजप : १ लाख ७०५
- आनंदा शंकर नालगे-पाटील : बळिराजा पार्टी : २९९
- अंकुश वसंत पाटील : जनहित लोकशाही पार्टी : १७६
- जीवन करकटे वंचित बहुजन आघाडी : ५५६
- नोटा : ८९९