अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर व शिराळा या दोन मतदारसंघावर साखर सम्राटांचे वर्चस्व आहे. याच साखरपट्ट्यात उत्पादित ऊस दराचा मुद्दा ऐन प्रचारसभेत ऐरणीवर आला आहे. दराच्या प्रश्नावरून एकमेकांना घेरण्याची रणनिती सुरू आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत गोड साखरेचे कडू राजकारण सुरू आहे.इस्लामपूर व शिराळा या मतदारसंघात एकास-एक लढत आहे. संघर्षमय लढतीमध्ये विविध पक्षांचे नेते आमने-सामने उभे ठाकले आहेत. विविध नेत्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच कोलांटउड्या मारणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाव वधारला आहे.इस्लामपूर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत काट्याची टक्कर आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी ऊस उत्पादकांची सलगी आहे. त्यामुळेच इस्लामपूर मतदारसंघात विरोधकांनी ऊस दराचा मुद्दा उचलून धरला आहे. राज्यातील इतर साखर कारखान्यापेक्षा उतारा जास्त असून, येथे ऊसाचा भाव कमी का ? असा मुद्दा नव्याने उपस्थित करण्यात आला आहे.
या मतदारसंघात महायुतीकडे हुतात्मा संकुलनाचे गौरव नायकवडी आहेत. परंतु, हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांची भूमिका आजही गुलदस्त्यात आहे. महायुतीमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांचा वेगवेगळा अजेंडा आहे. त्यामुळेच इस्लामपूर मतदारसंघात नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. सत्ताधारी साखर सम्राटांचे नेते म्हणून जयंत पाटील यांच्या विरोधात ऊस दराचा मुद्दा उचलून धरला जात आहे.
शिराळ्यातही कारखानदार आमने-सामने ..अशीच अवस्था शिराळा मतदारसंघात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात भाजपने उमेदवार दिला आहे. नाईक यांच्याकडे साखर कारखाना आहे. त्यामुळेच ऊस उत्पादकांची ताकद नाईक यांच्या पाठीशी आहे. परंतु, भाजपनेही साखर उद्योगातील सत्यजित देशमुख यांना उमेदवारी दिली, तर त्यांच्याशी वारणा खोऱ्यातील साखर सम्राट आमदार विनय कोरे यांची सलगी आहे. साखर कारखानदारांमध्ये दरवेळी दराच्या बाबतीत होणारी युती यंदा निवडणुकीमुळे विभागली गेली आहे. त्यातच साखर दराच्या मुद्यावरून गोड साखरेचे कडू राजकारण आता सुरू आहे.