इस्लामपूरला १९७८ ची पुनरावृत्ती करून इतिहास घडवा, गौरव नायकवडी यांनी केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 06:09 PM2024-11-15T18:09:09+5:302024-11-15T18:10:13+5:30

इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात बदलाच्या दृष्टीने चांगला उठाव झाला आहे. गेली ३५ वर्षे आपल्या खांद्यावर बसलेले भूत उतरवायचे आहे. ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Islampur make history by repeating 1978, Gaurav Nayakwadi appeals | इस्लामपूरला १९७८ ची पुनरावृत्ती करून इतिहास घडवा, गौरव नायकवडी यांनी केले आवाहन

इस्लामपूरला १९७८ ची पुनरावृत्ती करून इतिहास घडवा, गौरव नायकवडी यांनी केले आवाहन

इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात बदलाच्या दृष्टीने चांगला उठाव झाला आहे. गेली ३५ वर्षे आपल्या खांद्यावर बसलेले भूत उतरवायचे आहे. तुम्ही दबावतंत्राला बळी पडू नका. निशिकांत पाटील यांना निवडून देऊन बदल घडवा आणि भावी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडलेल्या विरोधकांचा पराजय करून १९७८ ची पुनरावृत्ती करून इतिहास घडवा, असेही आवाहन शिवसेनेचे नेते, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनी केले.

आष्टा येथील प्रचारसभेत नायकवडी बोलत होते. यावेळी उमेदवार निशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नायकवडी म्हणाले, आष्टा शहरातून चांगला उठाव झाला आहे. मतदारसंघात चांगले वातावरण आहे. एकास एक निवडणुकीने विरोधक हवालदिल झाले आहेत. जनतेनेच आता निवडणूक हातात घेतली आहे. निवडणूक विकास कामांवर झाली पाहिजे, असे आमचे मत आहे.

आजपर्यंत दबावतंत्र अवलंबून निवडणुका झाल्या. निवडणुका आल्यावर मतदारांना भेटणे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन, पुन्हा पाच वर्षे तिकडे पाठ फिरवायची, हेच काम विद्यमान आमदारांनी केले आहे. अशा नेतृत्वाला धडा शिकवण्याची संधी मिळाली आहे. त्याचे सोने करूया व १९७८ ची पुनरावृत्ती घडवूया.

निशिकांत पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकडे पाठ फिरवणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सर्वांना बदल घडवायचा असल्याने सर्व एकदिलाने काम करत आहेत. येणाऱ्या पाच वर्षांत आष्टा शहराचा चौफेर विकास करू.
यावेळी सतीश बापट, पोपट भानुसे, प्रवीण माने, अमोल पडळकर, दिलीप मोरे, नंदकिशोर आटुगडे, नीलेश कोळी, दयानंद सुजातक, अर्चनाताई माळी, शोभाताई हालुंडे उपस्थित होते.

ऊस उत्पादकांना न्याय देऊ

परिवर्तनाच्या लाटेत तुम्ही कोणत्याही दबावाला बळी पडू नका. ऊस, रस्ता, पाण्याची अडवणूक होईल, अशी भीती मनातून काढून टाका आणि बदलाच्या लढाईत सामील व्हा. निशिकांत पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी आमची राहील. हुतात्मा संकुलाने एकदा शब्द दिला की, मागे हटत नाही, असेही गौरव नायकवडी म्हणाले.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Islampur make history by repeating 1978, Gaurav Nayakwadi appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.