हणमंत पाटीलसांगली : पलूस-कडेगाव मतदारसंघात कदम व देशमुख ही दोन घराणी पारंपरिक विरोधक आहेत. या घराण्यातील दुसऱ्या पिढीतील माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम व भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्यात पहिल्यांदाच थेट लढत होत आहे. त्यामुळे ही लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.पूर्वीच्या भिलवडी-वांगी मतदारसंघाचे नाव आता पलूस-कडेगाव विधानसभा झाले आहे. १९९५ पासून माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम व माजी आमदार संपतराव देशमुख या दोन घराण्यांत पारंपरिक लढत सुरू झाली. १९९६ ला संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू पृथ्वीराज देशमुख व डॉ. पतंगराव कदम अशी लढत झाली.पुढे २०१८ साली डॉ. पतंगराव कदम यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. विश्वजित कदम हे सलग दोन वेळा निवडून आले. यावेळी २०१८ ची पोटनिवडणूक व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देशमुख घराण्यातील कोणी मैदानात नव्हते. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत कदम-देशमुख या दोन पारंपरिक विरोधी घराण्यातील दुसऱ्या पिढीत पहिल्यांदाच थेट लढत होत आहे.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
- ताकारी व टेंभू योजनेच्या कामांचा श्रेयवाद मतदारसंघात सुरू आहे. त्यासाठी डॉ. पतंगराव कदम यांनी निधी आणला, तर संपतराव देशमुख हे या योजनेचे जनक आहेत, असे दावेप्रतिदावे सुरू आहेत.
- साखर कारखान्यांची बिले व उसाला दर यावरून आरोप होत आहेत. यामध्ये उसाची बिले शेतकऱ्यांना देण्यास विलंब व थकबाकी असा मुद्दा गाजत आहे.
- पलूस तालुक्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर तातडीने व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
- महापूर आल्यानंतर नदीकाठच्या गावांना स्थलांतरित व्हावे लागते. हे स्थलांतर कायमस्वरूपी थांबविण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.
- टेंभू योजनेची जलवाहिनी शेताच्या बांधावर पोहोचविण्याचे आश्वासन दोन्ही बाजूने मतदारांना दिले जातेय.
२०१९ मध्ये काय घडले ?डॉ. विश्वजित कदम - काँग्रेस (विजयी)१,७१,४९७संजय विभुते - शिवसेना८,९७६नोटा२०,६५१