राजा सावध हो!, निष्ठावंत कार्यकर्त्यांची संजयकाका पाटील यांना साद; सोशल मीडियावरील पोस्टची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 06:17 PM2024-11-28T18:17:28+5:302024-11-28T18:19:02+5:30

माजी खासदार संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेतही पराभवाचा सामना करावा लागला

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 King be careful, the post of Sanjaykaka Patil supporters went viral on social media | राजा सावध हो!, निष्ठावंत कार्यकर्त्यांची संजयकाका पाटील यांना साद; सोशल मीडियावरील पोस्टची सर्वत्र चर्चा

राजा सावध हो!, निष्ठावंत कार्यकर्त्यांची संजयकाका पाटील यांना साद; सोशल मीडियावरील पोस्टची सर्वत्र चर्चा

दत्ता पाटील

तासगाव : माजी खासदार संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेला गाफीलपणा नडला, मात्र विधानसभेला पोटतिडकीने पळून देखील पराभव झाल्यामुळे हा पराभव निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

सध्या सोशल मीडियावर काका समर्थकांची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्या पोस्टमध्ये गद्दारीची चर्चा होत आहे. संजय पाटील यांना उद्देशून 'राजा, पटावरील सोंगट्या बदलण्याची वेळ झाली.' अशी साद संजय पाटील यांना घालण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून संजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. कार्यकर्त्यांना ते हॅट्ट्रिक करतील, असा आत्मविश्वास होता. मात्र या निवडणुकीत विजयी होणारच, हा त्यांच्या समर्थकांचा गाफिलपणा नडला. परिणामी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

विधानसभा निवडणुकीत राजकीय अस्तित्वासाठी संजय पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यांना माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी साथ दिली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकीतून बोध घेत पहिल्या टप्प्यापासूनच नियोजनबद्धपणे विधानसभेसाठी रणनीती आखली. निकालानंतर अपवाद वगळता बहुतांश गावांतून अनपेक्षितपणे बॅकफूटवर राहावे लागले. अनेक हक्कांच्या गावांतही मताधिक्य मिळाले नाही. काठावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवाची कारणमीमांसा होत असतानाच संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करण्यात आली. या पोस्टमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता जिवाच्या आकांताने संजय काकांच्या विजयासाठी पळाल्याचा संदर्भ आहे. बुद्धिबळाच्या खेळाचा संदर्भ देत प्यादी पळाली असली तरी हत्ती, घोडे, उंट यांनी गंमत बघितली. तर वजिरांनी गद्दारी केल्याची टीका केली आहे. येणाऱ्या काळात तरी संजय पाटील यांनी सावध होऊन पटावरील सोंगट्या बदलण्याची वेळ झाल्याचेही म्हटले आहे. या पोस्टमुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सोशल मीडियावरील पोस्टचीच सर्वत्र चर्चा

‘जिवाच्या आकांताने फक्त प्यादी पळाली. हत्ती, घोडे, उंट गंमत बघत राहिले. तुमचेच आहोत असं भासवून वजिरांनी सरळ सरळ गद्दारी केली. राजा आता तरी सावध हो, पटावरील सोंगट्या बदलण्याची वेळ झाली..!’ अशी पोस्ट संजय पाटील यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सध्या या पोस्टचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 King be careful, the post of Sanjaykaka Patil supporters went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.