शिराळा : एका कायद्याच्या आधारे शिराळा येथील नागपंचमीची परंपरा आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येताच जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा विधिवत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले.शिराळा येथे महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या वेळी खासदार धैर्यशील माने, भाजपचे नेते सम्राट महाडिक, राहुल महाडिक, आमदार सदाभाऊ खोत, दीपक शिंदे म्हैसाळकर, मकरंद देशपांडे उपस्थित होते.अमित शाह म्हणाले की, केवळ वोट बँका जपण्याचे काम काँग्रेस आघाडी सरकारने केले. त्यांच्याच काळात शिराळ्याची ऐतिहासिक नागपंचमी परंपरा बंद झाली. याच नागभूमीत मी शिराळकरांना वचन देतो की, महाराष्ट्रात सरकार येताच आम्ही येथील उत्सव पुन्हा सुरू करू. शिराळ्यात संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे करू. येथील डोंगरी तालुक्यात उद्योग आणून रोजगारही उपलब्ध करण्यात येईल.
शिराळ्यातील भुईकोट किल्ल्यातील छत्रपती संभाजी महाराज स्मृतिस्थळास राष्ट्रीय शौर्य स्मारक बनवावे, डोंगरी विभागाच्या विकासासाठी लक्ष घालावे, नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, अशा मागण्या या वेळी सत्यजित देशमुख यांनी केल्या.या वेळी आनंदराव पवार, संपतराव देशमुख, रणजितसिंह नाईक, पृथ्वीसिंह नाईक, प्रतापराव पाटील, हणमंतराव पाटील, के. डी. पाटील, रेणुकादेवी देशमुख, सी. बी. पाटील, सुखदेव पाटील, निशिकांत पाटील, शोभाताई नाईक, साईतेजस्वी देशमुख, वैशाली नाईक, अनिता धस उपस्थित होते.
आम्ही त्यांना मोठे करूशिराळा मतदारसंघातील जनतेने सत्यजित देशमुख यांना विजयी करावे. मतदारसंघातील विकास व सत्यजित यांना मोठे करण्याचे काम आम्ही करू, असे अमित शाह म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचे फलकसभेत उपस्थित महिलांनी हातात लाडकी बहीण योजनेचे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फलक हाती घेतले होते.