सांगली : जाती-जातीत आणि धर्मा-धर्मात फूट पाडून भाजप राजकारण करते. मराठा, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान भाजपने केले. हिंदुत्वाच्या नावाखाली बाजार मांडणाऱ्या भाजपला सत्तेतून हाकला, असे आवाहन काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केले.सांगली विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत हंडोरे मंगळवारी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, लोकशाही आणि संविधान म्हणजेच सर्वसामान्य माणसाचे अधिकार आणि हक्क टिकले पाहिजेत. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोनदा देशपातळीवर जनयात्रा काढली. लोकशाहीने दिलेल्या नागरिकांच्या अधिकारांवर गदा यायची भीती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आरएसएसने संविधान बदलण्याचा घाट घातला आहे. मागे वाजपेयींनीही हे प्रयत्न केले होते, तेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांनी ते हाणून पाडले होते. आता पुन्हा भाजपच्या अनेक नेत्यांनी संविधान बदलण्याचे सूतोवाच केले आहे. पण आपले अधिकार अबाधित राहण्यासाठी जनताच सजग झाली आहे. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहेत. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला याहून जास्त यश मिळेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
जातनिहाय जनगणना करणार ..भाजपने सर्व समाज बांधवांचे आरक्षणाचे मुद्दे कुजवत ठेवत समाजा समाजात दरी निर्माण केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जातीनिहाय जनगणना पूर्ण केली जाईल. शिवाय लोकसंख्येनुसार आरक्षणाची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येईल, असे आश्वासन हंडोरे यांनी दिले.
दलित समाज पृथ्वीराज यांच्यासोबतसांगली विधानसभेबाबत जिल्ह्यातील दलित समाजातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. एकमताने सारा दलित समाज आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याच मागे ठाम उभा राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार हंडोरे यांनी यावेळी दिली.