हणमंत पाटीलसांगली : महायुतीचे उमेदवार व भाजपचे कामगारमंत्री सुरेश खाडे हे मिरज राखीव मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. लोकसभा व महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षनिहाय स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवक विखुरलेले असतात. मात्र, सुरेश खाडे यांच्या विधानसभा निवडणुकीला हेच सर्वपक्षीय नगरसेवक व कार्यकर्ते मदतीला धावून येतात. हा मिरज पॅटर्न चार पंचवार्षिक निवडणुकांपासून खाडे यांच्यासोबत आहे. या निवडणुकीत सुरेश खाडे यांच्या विजयाचा वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेने तानाजी सातपुते यांना मैदानात उतरविले आहे.सांगली जिल्ह्यातील आठपैकी जत मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश खाडे पहिल्यांदा जतमधून जिल्ह्यात भाजपचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले. २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जतऐवजी शेजारचा मिरज हा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा भाजपचे सुरेश खाडे मिरज मतदारसंघातून निवडून आले. आता पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत चौथ्यांदा ते मिरजेतून मैदानात उतरले आहेत.लोकसभा, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते कोणाच्याही मतदारसंघात राजकीय हस्तक्षेप करीत नाहीत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे स्थानिक नेते, नगरसेवक व कार्यकर्ते त्यांना विधानसभा निवडणुकीत मदत करीत असल्याचा मिरज पॅटर्नचा फंडा प्रत्येक निवडणुकीला त्यांच्या मदतीला येतो. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते रिंगणात उतरले आहेत. त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते किती मदत करतात, यावर खाडे विरुद्ध सातपुते या लढतीच्या विजयाची समीकरणे ठरणार आहेत.
जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाचा कोणाला फायदा ?मिरज विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती-जमाती, मराठा, ब्राह्मण, तसेच, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध व शीख अशा विविध जातिधर्मांचे मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात जातीय व धार्मिक ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका व फायदा कोणाला होईल, यावर विजयाची गणिते ठरणार आहेत.
लोकसभेला काय घडले, त्याचा परिणाम काय ?लोकसभेला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना या मतदारसंघातून २४ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपचे संजयकाका पाटील यांना मिळाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मते उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मिळाली होती.मिरज मतदारसंघातून विशाल पाटील यांना एक लाख ९ हजार ११० मते मिळाली. त्यानंतर संजय पाटील यांना ८४ हजार २९ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकाची मते उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील यांना ८ हजार २१ मते मिळाली होती.
- एकूण मतदार : ३,३०,९६६
- पुरुष : १,६७,०९२
- स्त्री : १,६३,८४८
सन २०१९ मध्ये काय घडले?सुरेश खाडे भाजप (विजयी) ९६,३६९बाळासाहेब होनमोरे स्वाभिमानी शेतकरी पक्ष ६५,९७१
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?वर्ष - विजयी उमेदवार - पक्ष - मते
- २००९ - सुरेश खाडे - भाजप - ९६,४८२
- २०१४ - सुरेश खाडे - भाजप - ९३,७९५
- २०१९ - सुरेश खाडे - भाजप - ९६,३६९
निवडणुकीतील कळीचे मुद्दे..
- ‘आरोग्यपंढरी’ अशी ओळख असलेल्या मिरजेतील प्रसिद्ध मिशन रुग्णालय (वानलेस) डबघाईला आले आहे. मतदारसंघातील कामगारमंत्री असूनही या मिशन रुग्णालयातील कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही.
- सलग तीन वेळा निवडून येऊनही मिरज मतदारसंघातील रस्ता रुंदीकरण, गटारी, अतिक्रमण, वाहतूक कोंडी यांसारखे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत.
- मिरज शहरात विकास आराखड्याची (डीपी) अंमलबजावणी झाली नसल्याने नियोजनबद्ध विकास झालेला नाही.