Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सांगली जिल्ह्यात एक पॅटर्न दिसून येतो. २०१४ नंतर वसंतदादा कुटुंबाला एकदाही उमेदवारी मिळाली नाही. लोकसभेत आणि विधानसभेत फसवणूक झाली. वसंतदादा कुटुंबांने काँग्रेस पक्षाच्या विरोधात नेमकी काय चूक केली कळत नाही. वसंतदादा कुटुंबाची निष्ठा कुठे कमी पडली का? आदर्श कुठे कमी पडले का? एवढे होऊनी मी खासदार झाल्यावर पहिल्यांदा काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला, असे विशाल पाटील यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेली. अनेक प्रयत्न करूनही काँग्रेसला ही जागा मिळाली नाही. अखेर इच्छूक उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर या सांगली पॅटर्नची चर्चा राज्यभरात झाली. विधानसभा निवडणुकीतही सांगली पॅटर्नची चर्चा आहे. अनेक ठिकाणी हा पॅटर्न राबवण्याकडे उमेदवारांचा कल असल्याचेही पाहायला मिळत आहे. यातच आता विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. जयश्री पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार
जयश्री पाटील यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीची उमेदवारी आहे, असे मी जाहीर करतो. कारण मी खासदार म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. जसे लोकसभेत काँग्रेसचे ९९ खासदार निवडून आले आणि शंभरावा मी होतो, तसे जयश्री पाटील शंभराव्या आमदार असतील. आता संघर्ष संपला पाहिजे ही आमची भूमिका होती. जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो. सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला? का न्याय मिळत नाही हे कळत नाही. जयश्री पाटील लोकसभेला सर्वात पुढे होत्या. मग मी का त्यांच्या सभेला येऊ नये? ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची नाही. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, विशाल पाटील अपक्ष म्हणून याच विकास आघाडीचा घटक आहे, असे विशाल पाटील म्हणाले.
काँग्रेसने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराला पराभव करणास सक्षम नाही
वसंतदादा पाटील घराण्यावर काँग्रेस सातत्याने अन्याय का करतेय, असा प्रश्न करत, काँग्रेसने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराला पराभव करणास सक्षम नाही. म्हणून आम्ही उमेदवार दिला आहे आणि जयश्री पाटील या माझ्या उमेदवार आहे, हे मी जाहीर करतो. त्यामुळे अपक्ष असलेल्या जयश्री पाटील यांनाच निवडून द्या, असे आवाहन विशाल पाटील यांनी केले.
दरम्यान, सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. जयश्री पाटील उमेदवारीवर ठाम राहिल्या आणि उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे सांगलीत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा भाजपाचा पराभव होतो का, जयश्री पाटील अपक्ष म्हणून निवडून येऊन सांगली पॅटर्नचा प्रत्यय पुन्हा राज्याला पाहायला मिळतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.