तासगाव : मी केलं तर ती चूक आणि इतरांनी केलं तर ते बरोबर असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ च्या निवडणूक निकालानंतर लगेचच भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता, असे विधान अजित पवार यांनी केले. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संंजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अजित पवारांनी शाब्दिक टोलेबाजी केली. लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवलेल्या संजयकाकांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घड्याळ हाती घेत राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या रोहित पाटलांचे आव्हान आहे.
संजय पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करताना अजित पवारांनी शरद पवारांच्या वेगवेगळ्या भूमिकांबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले तेव्हा राष्ट्रवादीचे सगळे आमदार माझ्या चेंबरमध्ये जमा झाले. सगळ्यांनी सह्या केल्या आणि आपापल्या समस्या बोलून दाखवल्या. शरद पवारांकडे सगळ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. कोरोना काळात कामे न झाले असल्याचे सांगितले गेले, सगळ्यांनी अस्वस्थता बोलून दाखवली.
तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रत्यक्ष निकाल लागला नाही तोच राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला असे मला समजले. पण अचानक यात बदल झाला. तेव्हा वरिष्ठांना विचारले असता राजकीय परिस्थिती पाहून तो निर्णय घेण्यात आला असे सांगण्यात आले. पण, आता मी भाजपसोबत जाऊन तेच केले आहे. मी केलं तर चूक आणि इतरांनी केलं तर ते बरोबर असे आहे, मी काल आठव्यांदा माझ्या बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. मी आणि आर आर पाटील यांनी एकत्र काम केलंय. १९९९ साली सरकार आलं. परकीय व्यक्ती (सोनिया गांधी) या देशाची पंतप्रधान होता कामा नये असे बोलले गेले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. आम्हाला काँग्रेसमधून हकलून देण्यात आले. पण, ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि लगेच आम्ही काँग्रेसच्या विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये सामील झालो. हे सर्वकाही अचानक घडले. पण, आता आम्ही सरकारमध्ये आहोत कोणावरच अन्याय होऊन देणार नाही, अल्पसंख्याक असो की मग तो कुणीही असो, अशा शब्दांत अजित पवारांनी शाब्दिक टोलेबाजी केली.
दरम्यान, सध्या होत असलेले विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ हातात घेतले. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या दोन महिन्यातच दोन्ही नेत्यांनी अनपेक्षित पणे बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे या मतदारसंघातील नेत्यांच्या राजकीय वाटचालीची चर्चा सुरू झाली आहे.