सांगली : निवडणुकांच्या काळात माझ्या मुख्यमंत्रिपदाचा विषय उपस्थित करणे योग्य नाही. जरी मी सर्वात ज्येष्ठ असलो, तरी त्याबाबत फार तीव्र महत्त्वाकांक्षा नाही. आमच्यातील कोणीही मुख्यमंत्री झाले, तर त्याला माझी हरकत नाही, असे मत काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.सांगलीवाडी येथे बुधवारी काँग्रेसची प्रचारसभा पार पडली. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्रिपदासाठी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. महायुतीतील नेत्यांमधून कोणाचीही मुख्यमंत्रिपदाची चर्चा दिसत नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार, हे जनतेने निश्चित केले आहे. माझ्या मुख्यमंत्रिपदाचा विषय सभांमधून उपस्थित करू नये. कोणालाही मुख्यमंत्री केले, तरी माझी त्याला हरकत नाही. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आणणे, हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.महायुतीच्या काळात आमदारांचा बाजार मांडला गेला, टक्केवारीचा खेळ सुरू झाला. पैशाचे खेळ झाले. अमली पदार्थांचा विळखा महाराष्ट्राला पडला. धनाढ्य लोकांच्या मुलांनी सामान्य नागरिकांना चिरडण्यास सुरुवात केली. हे प्रकार थांबवायचे असतील, तर महायुतीला त्यांची जागा दाखवावी. पैशाचा महापूर आता येणार आहे. त्याला भुलून चुकीच्या लोकांना निवडू नका, असे आवाहन त्यांनी केले.
ही तर लाडकी सत्ता योजनाथोरात म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा फटका बसल्यानंतर महायुतीला लाडकी बहीण योजना आठवली. त्यांच्या दृष्टीने बहीण लाडकी नसून सत्ता लाडकी आहे. या सत्तेसाठीची ही योजना आहे. काँग्रेसने देशात प्रथम महिलांसाठी अशी योजना आणली. त्याचे अनुकरण महायुतीने केले.