खानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघातून आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी बंडखोरी केल्याने खानापूर मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली आहेत.खानापूर मतदारसंघात शिंदेसेनेचे सुहास बाबर व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. वैभव पाटील यांच्यात थेट लढतीची शक्यता होती. या मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहता देशमुख गट ज्यांच्या बाजूला त्याचे पारडे जड असते. १९९५ मध्ये राजेंद्रअण्णा देशमुख हे अपक्ष म्हणून निवडून आले होते.त्यानंतर २०१४ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत त्यांनी इतरांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीतही त्यांचा गट कुणाला पाठिंबा देतो, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, राजेंद्र देशमुख यांनी स्वतःच बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरले आहेत.
खानापूरच्या मतविभाजनाचा कोणाला फायदा२००९ च्या निवडणुकीत सदाशिवराव पाटील, अनिल बाबर व गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या तिरंगी लढतीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातून घेतलेल्या मतांचा फटका अनिल बाबर यांना बसला. त्यामुळे सदाशिवराव पाटील यांचा विजय झाला होता.२०१४च्या निवडणुकीमध्ये अनिल बाबर, सदाशिवराव पाटील, अमरसिंह देशमुख व गोपीचंद पडळकर अशी चौरंगी लढत झाली होती. या लढतीमध्ये विजयी झालेल्या अनिल बाबर यांच्यापेक्षा आटपाडी तालुक्यातील अमरसिंह देशमुख व गोपीचंद पडळकर यांच्या मतांची बेरीज जास्त होती. त्यामुळे या निवडणुकीत खानापूर तालुक्यातील उमेदवारांच्या मत विभाजनाचा फायदा कोणाला होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.