अशोक पाटीलइस्लामपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ३५ वर्षांत इस्लामपूर मतदारसंघाचा विकास काय केला. यावर विरोधी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार निशिकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सवाल उपस्थित केला. याउलट निशिकांत पाटील यांनी आपल्या ५ वर्षांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विकास काय केले, असाही प्रतिसवाल जयंत पाटील समर्थक करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात ३५ आणि पाचचे राजकारण चांगलेच रंगणार आहे.इस्लामपूर मतदारसंघावर सलग ३५ वर्षे जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत इस्लामपूर-आष्टा शहरासह मतदारसंघात विविध विकासकामांसाठी निधी आणला. सहकार क्षेत्रातील साखर उद्योगाला गती दिली. ग्रामीण भागातून शहरी भागात येणाऱ्या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला. इस्लामपूर शहरात २४७७ पाणी योजना, भुयारी गटारी, घरकुल, बगीचे आदी विकास केला. हाच अजेंडा घेऊन जयंत पाटील आठव्यांदा निवडणूक लढवत आहेत.विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून हाती ‘घड्याळ’ बांधले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपूर मतदारसंघात एन्ट्री करून घड्याळाची टिक-टिक सुरू केली. जयंत पाटील यांच्या ‘तुतारी’विरोधात निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन कडवे आव्हान उभे केले.
‘घड्याळा’ची टिक-टिक की ‘तुतारी’ची गर्जना?गेल्या ३५ वर्षांत जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकास केला. तर तीन सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांना गती दिली. कारखान्यांनी दिलेल्या ऊस दराचा मुद्दा आदी विकासकामांचे भांडवल करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात एन्ट्री केली. येणाऱ्या २३ नोव्हेंबरला ‘घड्याळा’ची टिक-टिक की ‘तुतारी’ची गर्जना मतदारसंघात घुमणार, यावर रंगतदार चर्चा सुरू आहे.