Sangli: सभेत कार्यकर्त्यांशी बोलताना पृथ्वीराज पाटील गहिवरले; जयश्रीताईंना म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:38 PM2024-10-30T12:38:58+5:302024-10-30T12:40:07+5:30

आमदार सुधीर गाडगीळ यांची हॅट्रीक मी होऊ देणार नाही

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Prithviraj Patil while talking to the workers in the meeting elaborated | Sangli: सभेत कार्यकर्त्यांशी बोलताना पृथ्वीराज पाटील गहिवरले; जयश्रीताईंना म्हणाले..

Sangli: सभेत कार्यकर्त्यांशी बोलताना पृथ्वीराज पाटील गहिवरले; जयश्रीताईंना म्हणाले..

सांगली : काँग्रेससाठी आम्ही खूप भोगले. माझ्याकडे केडर नाही म्हणून हिणविण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असून, भाजपमध्ये जाणार आहेत. यांसह अनेक टीकाटिप्पणी करून माझी बदनामी केली. मला एकटे पाडले. परंतु, डगमगलो नाही. तुमच्या प्रेमावर काँग्रेसने मला उमेदवारी देऊन माझ्या कामगिरीवर विश्वास दाखविला, अशी भूमिका मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर मांडताना काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील गहिवरले.

काँग्रेसचा विजय संकल्प मेळावा मंगळवारी सांगलीत झाला. यावेळी पृथ्वीराज पाटील बोलत होते. ते म्हणाले, माजी मंत्री मदन पाटील यांचा २०१४ च्या विधानसभेला पराभव झाल्यानंतर त्यांना झालेल्या वेदना मी जवळून पाहिल्या होत्या. त्यांना पराभूत करणारे आमदार सुधीर गाडगीळ यांची हॅट्रीक मी होऊ देणार नाही. वहिनी, तुम्ही राग सोडा आणि आशीर्वाद द्या, जिंकायला ताकद द्या. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हयातीत काँग्रेस फुटली, तेव्हा माझे वडील त्यांच्यासोबत उभे राहिले. आमच्या घरावर तेव्हा दगड पडले होते. काँग्रेससाठी आम्ही खूप भोगले आहे.

जयश्री वहिनी रागावणे साहाजिक आहे. त्यांचा उमेदवारी मागण्याचा हक्क, मात्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना मी सांगून आलोय, वहिनींना विधान परिषद द्यावीच लागेल. त्याशिवाय माझा विजय शक्य होणार नाही. रमेश चेन्नीथला वहिनींशी बोलले आहेत. मला विश्वास आहे, त्या राग बाजूला सारून पुढे येतील. काँग्रेस एकसंधपणे लढेल.

जयश्रीताई, आपल्या भांडणात तिसऱ्याचा लाभ नको

काँग्रेसकडे उमेदवारी मिळविण्यासाठी जयश्रीताई पाटील आणि मी प्रयत्न केले. या प्रयत्नात पक्षश्रेष्ठींनी माझ्या कामगिरीची दखल घेऊन मला उमेदवारी दिली. या ठिकाणी वाद मिटवून आपण जातीयवादी भाजपच्या पराभवासाठी एकत्रित निवडणूक लढविण्याची गरज आहे. आपण भांडत बसलो, तर तिसऱ्याचा लाभ होईल, असे म्हणून पृथ्वीराज पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जाहीर विनंती केली.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Prithviraj Patil while talking to the workers in the meeting elaborated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.