सांगली : जिल्ह्यातील सांगली, मिरज आणि पलूस-कडेगाव या तीन मतदारसंघांत पुरुषापेक्षा महिला मतदार जास्त आहेत. जिल्ह्यात पंधरा ते वीस वर्षांपूर्वी सांगली जिल्हा मुलींच्या कमी जन्मदर संख्येमुळे राज्यात आघाडीवर होता. आता हे चित्र बदलले आहे. आठपैकी तीन मतदारसंघांत लाडक्या बहिणी ‘किंगमेकर’ नसल्या तरी प्रभावी ठरू शकतात.सांगली जिल्हा पंधरा ते वीस वर्षांपूर्वी राज्यात मुलींच्या जन्मदर संख्येवरून चर्चेत आला होता. दर हजारी मुलांच्या तुलनेत मुलींचे जन्माचे प्रमाण खूपच कमी होते. त्यानंतर जनजागृतीमुळे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत गेले होते. सध्याचे चित्र समाधानकारक म्हणावे लागेल. दुसरीकडे विधानसभा मतदारसंघातील महिला मतदारांच्या संख्येकडे नजर टाकल्यास तीन मतदार संघात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे.३० ते ४० वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर महिला मतदार या घरातील कर्ता पुरुष सांगेल त्या उमेदवाराला मतदान करत होत्या. परंतु काळ बदलला आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. निवडणुकांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे त्यांच्या मताला किंमत आली आहे. महिला स्वत:चे मत हव्या त्या उमेदवाराला देत आहेत. तसेच महिलांचे मत ज्याच्या पारड्यात अधिक पडेल ते उमेदवारही निवडून येत आहेत.जिल्ह्यात सांगली, मिरज आणि पलूस-कडेगाव या तीन विधानसभा मतदारसंघात यंदा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंद झालेल्या जिल्हा प्रशासनाकडील आकडेवारीवरून दिसून येत आहे. या ठिकाणी महिला मतदार प्रभावी ठरू शकतात.या मतदारसंघात असे आहे मतदानाचे गणित
- मिरज मतदारसंघात पुरुष मतदार १ लाख ७१ हजार ६४६ असून महिला मतदार १ लाख ७२ हजार १९८ इतक्या आहेत. येथे ५५२ महिला मतदार जास्त आहेत.
- सांगलीत पुरुष मतदार १ लाख ७७ हजार ६९३ असून महिला मतदार १ लाख ७८ हजार ६४२ आहेत. येथे ९४९ महिला मतदार जास्त आहेत.
- पलूस-कडेगावमध्ये पुरुष मतदार १ लाख ४६ हजार ७२ असून महिला १ लाख ४६ हजार ७८६ आहेत. येथे ७१४ महिला जास्त आहेत.