शिराळा : शिराळा मतदारसंघाला कामातून विकासाचा चेहरा देणाऱ्या मानसिंगराव नाईक यांचा विजय प्रचंड मतांनी नोंदवून जाती, धर्मात व माणसा माणसात दरी पाडून सत्तेची पोळी भाजणाऱ्या भाजपला व त्यांच्याशी संगत करणाऱ्यांना सत्तेपासून रोखावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.ऐतवडे बुद्रूक (ता. वाळवा) येथे शिराळा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, अभिजीत पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला जात असताना मूग गिळून गप्प बसली. त्यामुळे बेरोजगारी वाढून युवकांच्या हाताला काम नाही. महागाईने कळस गाठला आहे. शेती मालाला दर नाही.
लोकसभेतील पराभवानंतर या मंडळींना शेतकऱ्यांचा व लाडक्या बहिणींची आठवण झाल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांची फसगत करण्याचा उद्योग चालवला आहे; पण राज्यात बहिणी व शेतकरी सुरक्षित नाहीत. १८ टक्के जीएसटीच्या मार्गाने सर्वसामान्यांचे खिसे कापण्याचा उद्योग केला आहे. मानसिंगभाऊंनी मतदारसंघात मोठी विकासकामे करून मतदारांनी २०१९ ला दाखविलेला विश्वास सार्थ ठरवला आहे.यावेळी महेश कांबळे, राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, शहाजी पाटील, डॉ. धनंजय माने, बळीराजा संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाहीमानसिंगराव नाईक म्हणाले, दर्जेदार विकासकामे करत मतदारसंघाची मजबूत बांधणी केली आहे. माझ्या हातून विकास झाला असेल, तर मला निवडून द्या. विरोधी उमेदवाराचे मतदारसंघाच्या विकासात कोणत्याही प्रकारचे योगदान नाही. खरे तर, त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही.