सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करून जयश्री मदन पाटील यांनी अर्ज ठेवला आहे. याबद्दल काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी त्यांच्यावर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे.लोकसभेमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात राज्यभर गाजलेला सांगली पॅटर्न आता विधानसभेतही कायम राहिल्याचे दिसून येत आहे. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्याला खासदार विशाल पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला.वसंतदादा कुटुंबात २०१४ नंतर तिकीट मिळाले नाही, आमची काय चूक झाली असा सवाल विशाल पाटील यांनी विचारला होता. काँग्रेसने गुरुवारी जयश्री पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनाही काँग्रेस पक्षाकडून कारवाईचा इशारा दिला आहे.
मी पक्षाशी सदैव एकनिष्ठ : जयश्री पाटीलवसंतदादा घराण्याने काँग्रेससाठी मोठे योगदान दिले आहे. पक्षानेही आम्हाला पदे दिली आहे. मी पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहिले. पण गेल्या काही वर्षांत वसंतदादा घराण्याला उमेदवारी देताना डावलण्याचे काम पक्षातील काही मंडळींनी केले. यंदाही मी गुणवत्तेवर पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण, ऐनवेळी षडयंत्र करून माझी उमेदवारी डावलली गेली. महाआघाडीचे घटक असलेले खासदार विशाल पाटील यांनी माजी उमेदवारी महाआघाडीचीच असल्याचे जाहीर केली आहे. त्यामुळे मी महाआघाडीचीच अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवीत आहे. एक महिला उमेदवार म्हणून मला पाठिंबाही मिळत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस बंडखोर उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी दिली.
दोन दिवसांत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करा, अन्यथा कारवाई : एम. डी. पाटीलसांगलीत गुरुवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी आणि कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. डी. पाटील यांनी घेतली. या बैठकीत दोन दिवसांत काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार सुरू केला पाहिजे, अन्यथा संबंधित पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.