सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण दडपण्यासाठीच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपकडून ईडी, सीबीआय यंत्रणांचा धाक दाखवून काँग्रेस फोडली आहे, असा आरोप काँग्रेसचे सांगली विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच, काँग्रेस फोडण्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मिरजेतील निकटवर्तीय यांचा हात असल्याचेही ते म्हणाले.पाटील म्हणाले, वसंतदादा बँक अपहारप्रकरणी बँकेच्या २७ माजी संचालक आणि मयत संचालकाचे ११ वारसदार, दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल आहे. १०१ मालमत्तांवर सरकारने टाच आणली होती. त्या मालमत्ता जप्तीचे आदेशही दिले होते. मात्र, भाजपने ही फाइल कटकारस्थान करण्यासाठी राखून ठेवली होती. या चौकशीला तत्कालीन भाजप सरकारने २०१८ साली स्थगिती दिली. आता डाव साधून २०२२ साली प्रकरणाची फेरचौकशी लावली.चार वर्षे शांत झालेले चौकशीचे भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसवले. २०२१ ला फोडाफोडी करून राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर ही फाइल पुन्हा उघडली. या प्रकरणात भाजपने बारकाईने कट शिजवला. ईडी, सीबीआय, जेल, लिलाव अशा धमक्या दिल्या गेल्या. निवडणुकीची तयारी नसताना त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला. विधान परिषदेचे सदस्यत्व नाकारले. हे का झाले? यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या मिरजेतील निकटवर्तीयाने या बंडाचे डील केले. आता हे धर्मसंकट असल्याचे सांगून कृपया मतदारांची दिशाभूल करू नये. हे धर्मसंकट नसून भाजपचा कट आहे. त्यांच्या भोवतीच्या बडव्यांनी काँग्रेससोबत केलेली गद्दारी आहे.
बडव्यांनी बंड उभा केलेबहुजन समाज या चक्रव्यूहात अडकणार नाही, कारण आमदार सुधीर गाडगीळ यांनी मैदानातून काढलेला पळ हा वसंतदादा बँकेच्या आडून केलेला कट फसत असल्याने होता. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्याने स्वतः लक्ष घालून या प्रकरणात दबावतंत्र वापरले आणि बडव्यांनी बंड उभा केले. डॉ. विश्वजीत कदम यांना या बडव्यांचा डाव कळालेला आहे, म्हणूनच त्यांनी वहिनींना फितवणाऱ्यांची खैर नाही, असा इशारा दिला आहे, असेही पाटील म्हणाले.
ठेवीदारांच्या मुलांची शिक्षणे थांबलीपृथ्वीराज पाटील म्हणाले, वसंतदादा बँकेत अपहारामुळे दहा हजारांहून अधिक ठेवीदार कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. ठेवीदारांच्या मुलाबाळांना उपाशी राहावे लागले. मुलीच्या लग्नाला पैसे मिळाले नाहीत, मुलांची शिक्षणे थांबली. ज्येष्ठ नागरिकांना औषधाला, उपचाराला पैसे मिळाले नाहीत. लोकांना हे माहिती आहे. लोक शहाणे आहेत.