हणमंत पाटीलसांगली : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत एकतर्फी वाटणारी निवडणूक नेत्यांच्या सभा व राजकीय डावपेचाने चुरशीची झाली आहे. सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, शिराळा, जत व खानापूर मतदारसंघांत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सांगली जिल्हा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील मतदार हा सजग व सुज्ञ आहे. त्यामुळे अनेकदा प्रस्थापित नेतृत्वाला धक्के दिल्याचा प्रत्येक मतदारसंघाचा वेगळा इतिहास आहे. लोकसभेला सांगलीसह विविध जिल्ह्यांतील मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला होता. त्यामुळे सर्वांनाच विधानसभा निवडणुकीची उत्सुकता होती. २२ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे आदेश आले. त्यावेळी जागावाटपाची उत्सुकता होती. मात्र, लोकसभेला जिल्ह्यातील जागा भाजपने गमावली. त्यामुळे जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत जागावाटप करताना महायुतीने प्रत्येक मतदारसंघात दिग्गज उमेदवार देण्याची रणनीती आखली. त्यानुसार इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघांत भाजपच्या नेत्यांना ऐनवेळी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उभे करण्यात आले. तसेच, जत वगळता उर्वरित सात मतदारसंघांतील बंडखोरी मागे घेण्यात त्यांना यश आले. उलट महाविकास आघाडीतील नेत्यांना सांगली व खानापूर मतदारसंघातील बंडखोरी थोपविता आली नाही. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील चित्र ३६० डिग्रीमध्ये बदलल्याने धक्कादायक निकाल लागू शकतो.
सांगलीतील बंडखोरीने बदलेले समीकरण..महाविकास आघाडीने मात्र देशातील व राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा सांगली जिल्ह्यात सर्वाधिक घेतल्या. त्याचा फायदा विविध मतदारसंघांत वातावरण निर्मितीसाठी झाल्याचे दिसून आले. सांगली विधानसभेतील भाजपचे उमेदवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विनोद तावडे व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सभा झाल्या. तर काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची सभा झाली. मात्र, काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार जयश्री पाटील या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची किती मते खेचून घेणार, यावर गाडगीळ की पृथ्वीराज पाटील यांच्या विजयाचे गणित ठरणार आहे.
तासगाव-कवठेमहांकाळमध्ये काट्याची लढत..तासगाव-कवठेमहांकाळच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्या ऐवजी पुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली. त्यामुळे विरोधात उमेदवार कोण? याविषयी उत्सुकता होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी खासदार संजय पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन हाती ‘घड्याळ’ बांधले. त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक चुरशीची झाली. लोकसभेतील पराभवाने संजय पाटील यांनी आपली रणनीती बदलली. त्यामुळे ही निवडणूक रोहित विरुद्ध संजय पाटील, अशी काट्याची झाली असून, येथेही धक्कादायक निकालाची उत्सुकता आहे.
आटपाडीच्या बंडखोरीने बिघडविली गणिते..खानापूर मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्यानंतर महायुतीने शिंदेसेनेचे सुहास बाबर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मतदारसंघात अनिलभाऊ यांच्या सहानुभूतीने ही निवडणूक बाबर यांच्यासाठी सोपी जाईल, असे सुरुवातीचे अंदाज होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद सोडून ॲड. वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तसेच, महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळविण्यात यश आले. मात्र, राजेंद्र देशमुख यांनी बंडखोरी केल्याने पुन्हा दोन्ही उमेदवारांच्या एकास एक लढतीचे गणित बिघडले आहे. विसापूर सर्कल, विटा शहर, खानापूर ग्रामीण व आटपाडी तालुक्यातील किती आणि कोणत्या उमेदवाराची मते राजेंद्रअण्णा देशमुख घेणार, यावर दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
जातीचा की भूमिपुत्राचा पॅटर्न जतमध्ये चालणार ?सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना केवळ जत मतदारसंघात मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे भाजपने जत मतदारसंघात धनगर व लिंगायत समाजाचे गणित जुळविण्यासाठी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाल्याने सुरुवातीला पडळकर यांची जोरदार हवा झाली. मात्र, तालुक्याच्या बाहेरचा ‘उमेदवार नको, भूमिपूत्र हवा’, अशी भूमिका घेत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, प्रकाश जमदाडे व तम्मनगौडा रवी पाटील यांनी बंडाचे निशाण उगारले. तम्मणगौडा रवी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला. तर प्रकाश जमदाडे यांनी काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपची लोकसभेतील नेत्यांची एकजूट विधानसभेला तुटली. तरीही मतदारसंघात पडळकर यांची हवा चालते, सावंत यांना कामाची पावती मिळते की रवी पाटील यांची बंडखोरी यशस्वी होते, याची जतकरांना उत्सुकता आहे.
शिराळ्याच्या निकालाची मुंबईकरांना उत्सुकता..शिराळा मतदारसंघातील आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गतवेळीच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी होऊन विजय सोपा झाला होता. या निवडणुकीतही सम्राट महाडिक यांनी बंडखोरीचे निशाण उगारले होते. मात्र, महायुतीला महाडिक यांची बंडखोरी रोखण्यात यश आले. त्यामुळे शिराळ्यात महाविकास आघाडीचे नाईक विरुद्ध महायुतीचे सत्यजित देशमुख अशी एकास एक लढत होत आहे. या ठिकाणी वाळवा तालुक्यातील ४८ गावे निर्णायक ठरणार आहेत. मात्र, या गावातून विविध अफवा पसरविण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून करण्यात आला आहे. त्यामुळे ४८ गावांतील मतदान हे देशमुख की नाईक यांना तारक ठरणार, याविषयी उत्सुकता वाढली. ही उत्सुकता मतदारांसाठी मुंबईतून खासगी बसने शिराळ्यात आलेल्या प्रत्येक मुंबईकराला आहे.