सांगली : जिल्ह्यात आज, बुधवार (दि.२०) मतदारांनी मतदानासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदानइस्लामपूर मतदारसंघात झाले आहे. त्याखालोखाल सांगली मतदारसंघात ७.६ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात एकूण ६.१४ टक्के मतदान झाले.
आठ विधानसभा मतदारसंघातील ९९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास १८.५५ टक्के मतदान झाले असून सांगली शहरात अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. इस्लामपूर मतदारसंघात सर्वाधिक २२.२६ टक्के मतदान झाले आहे.पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख पत्नी व मुलगी यांनी मतदानाचा हक्क बजावला. विटा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. वैभव पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.जिल्ह्यातील आठपैकी सांगली, खानापूर व जत मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे. त्यामध्ये सांगली मतदारसंघात काँग्रेसमध्ये, खानापूरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आणि जतला भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश देऊन त्यांना महायुतीची उमेदवारी दिली. तसेच तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे रोहित पाटील यांच्याविरोधात भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लढत होत आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातही डॉ. विश्वजीत कदम यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी भाजपाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्याशी एकास एक थेट लढत होत आहे. जिल्ह्यातील आठपैकी मिरज मतदारसंघाचा अपवाद वगळता सात मतदारसंघांत तुल्यबळ लढती असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे
- मिरज - ६.३२
- सांगली - ७.६
- इस्लामपूर - ८.१३
- शिराळा - ६.२९
- पलूस कडेगाव - ४.७७
- खानापूर - ४.७१
- तासगाव कवठेमहाकाळ - ६.३७
- जत - ४.९४
सकाळी ११ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे
- मिरज १७.७
- सांगली १९.६
- इस्लामपूर २२.२६
- शिराळा २०.४९
- पलूस-कडेगाव १७.३४
- खानापूर १६.२५
- तासगाव-कवठेमहांकाळ १८.६७
- जत १६.५२