काँग्रेसकडून विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत यांना पुन्हा संधी; सांगली मतदारसंघातील तिढा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 01:24 PM2024-10-25T13:24:08+5:302024-10-25T13:26:30+5:30

कदम, सावंत तिसऱ्यांदा रिंगणात..

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Vishwajit Kadam and Vikram Singh Sawant have been announced as candidates from Sangli district by Congress | काँग्रेसकडून विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत यांना पुन्हा संधी; सांगली मतदारसंघातील तिढा कायम

काँग्रेसकडून विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत यांना पुन्हा संधी; सांगली मतदारसंघातील तिढा कायम

सांगली : बंडखोरी होण्याच्या शक्यतेमुळे काँग्रेसच्या पहिल्या यादीतून सांगली विधानसभेला वगळण्यात आले. उर्वरित कडेगाव-पलूस मतदारसंघातून डॉ. विश्वजित कदम आणि जत मतदारसंघातून विक्रमसिंह सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, मिरज मतदारसंघ उद्धवसेनेला सोडणार की काँग्रेसकडे घेणार, यावर निर्णय झालेला नाही.

काँग्रेसची पहिल्या ४८ उमेदवारांची यादी गुरुवारी रात्री जाहीर झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीतील जागा वाटपानुसार काँग्रेसकडे सांगली, कडेगाव-पलूस व जत मतदारसंघ आहे तर मिरज मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. मात्र, पहिल्या यादीत केवळ जत व कडेगाव-पलूस मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, सांगली विधानसभेतील उमेदवारीचा तिढा सुटला नसल्याने या मतदारसंघाचा समावेश यादीत नाही.

सांगली विधानसभेचा तिढा कायम..

सांगली विधानसभेतून शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व सांगली जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत. उमेदवारी न दिल्यास दोन्ही इच्छुकांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविण्याचा इशारा दिला आहे. एकाने विधानसभा लढवावी आणि दुसऱ्याने विधान परिषदेवर जावे, असा तोडगा माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांनी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही इच्छुक माघार घेण्यास तयार नसल्याने उमेदवारीचा तिढा कायम आहे.

विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत तिसऱ्यांदा रिंगणात..

माजी राज्यमंत्री विश्वजित कदम हे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर २०१८ च्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती. आता २०२४ च्या विधानसभेसाठी ते तिसऱ्यांदा रिंगणात उतरत आहेत. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत हेसुद्धा तिसऱ्यांदा रिंगणात उतरत आहेत. दोनपैकी एका निवडणुकीत त्यांना विजय मिळाला होता. २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Vishwajit Kadam and Vikram Singh Sawant have been announced as candidates from Sangli district by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.