पलूस : ज्यांनी आमचा पक्ष फोडला, घर फोडले, चिन्ह हिसकावून घेतले, त्यांना ही जनता व माझे कुटुंब कधीच माफ करणार नाही. आमची लढाई दिल्लीच्या शक्तीविरोधात आहे. काेणत्याही परिस्थितीत दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.औदुंबर (ता. पलूस) येथे काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम, अरुण लाड, महेंद्र लाड, मोहनराव कदम, स्वप्निल कदम, अभिजित पाटील, संजय विभूते उपस्थित होते.सुप्रिया सुळे म्हणाल्या, विश्वजित कदम हे माझ्या भावासारखे आहेत. त्यांना पतंगराव कदम यांच्यासारख्या नेत्याचा वैचारिक वारसा लाभला आहे. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वाला उच्चांकी मतांनी निवडून द्यावे. विश्वजित यांच्यावर जिल्ह्यातील पाच आमदारांची जबाबदारी आहे. ते ती प्रामाणिकपणे पार पाडतील.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, बायका नवऱ्याचे ऐकत नसतील तर सरकारच्या भूलथापा व त्यांनी दाखवलेल्या गाजराच्या पुंगीला व आमिषाला कशा बळी पडतील?जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वांत जास्त भ्रष्टाचार करणारे सरकार दोन वर्षे सत्तेवर होते. त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्यालाही सोडले नाही. अशा सरकारला खाली खेचा व महाविकास आघाडीचे सरकार राज्यात निवडून आणावे. विश्वजित हे कर्णाचे दुसरे अवतार आहेत. त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे.
महायुतीच्या भ्रष्ट सरकारमुळे महाराष्ट्राच्या अर्थिक विकासाचा दर घसरला आहे. पन्नास टक्के गुन्हेगार व भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत. ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना सत्तेचे वाटेकरी केले, हे पाप कधी फेडणार? महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात एक नंबरला होता तो आता ११ व्या क्रमांकावर गेला आहे. आता गुजरात एक नंबरवर कसे गेले, याचा शोध घेतला तर महाराष्ट्राची अस्मिता बुडवायचे काम मिंदे सरकार करत आहे, हे कळेल.यावेळी मोहनराव कदम, जयसिंग कदम, बाळासाहेब पवार, रघुनाथ कदम, शिवाजीराव कदम, जे. के. जाधव, पूजा पाटील, दिगंबर पाटील, किरण लाड, ममता संपकाळ, राऊसाहेब पाटील मान्यवर उपस्थित होते.