Maharashtra Election 2019 : शागिर्दांच्या खडाखडीत वस्तादांची नुरा कुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:25 AM2019-10-10T04:25:58+5:302019-10-10T04:30:02+5:30

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून इस्लामपूरमध्ये एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न फसले.

Maharashtra Election 2019: Wrestling Nura wrestles in the backyard | Maharashtra Election 2019 : शागिर्दांच्या खडाखडीत वस्तादांची नुरा कुस्ती

Maharashtra Election 2019 : शागिर्दांच्या खडाखडीत वस्तादांची नुरा कुस्ती

Next

- श्रीनिवास नागे

सांगली जिल्ह्यातील आठपैकी तीन जागांवर तिरंगी, तर पाच ठिकाणी दुरंगी सामना रंगणार आहे. तीन जागांवर वर्षभर तयारी केलेले तगडे उमेदवार असतानाही भाजपने त्या जागा शिवसेनेला का सोडल्या आणि स्वत:कडे ताकदीचे उमेदवार नसतानाही शिवसेनेने त्या जागा का घेतल्या, या प्रश्नाने मात्र जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून इस्लामपूरमध्ये एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न फसले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे हेवेदावे उफाळून आले. खोत यांचे नाव मागे पडले, पण त्यांनी गौरव नायकवडी यांचे नाव पुढे केले. त्यातच ही जागा शिवसेनेकडे गेली. सेनेने भाजपचे इच्छुक नायकवडी यांनाच तिकीट दिले. आता निशिकांत पाटीलही अपक्ष म्हणून लढत आहेत.
पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसकडून विश्वजित कदम आणि भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांच्यातील टक्कर अपेक्षित होती, मात्र ही जागाही शिवसेनेकडे गेली आणि हा सामना टळला. देशमुख रिंगणाबाहेर राहिले.
तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्टÑवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्याविरोधात शिवसेनेने भाजपमधूनच आयात केलेल्या अजितराव घोरपडेंना उभे केले. या तीन जागा भाजपने का सोडल्या? तयारी केलेल्या शागिर्दांची खडाखडी सुरू असताना ‘वर’चे वस्ताद नुरा कुस्ती करत आहेत का, हा सवाल उपस्थित होत आहे. मिरजेत भाजपचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात काँग्रेस आघाडीला उमेदवाराची शोधाशोध करावी लागली. सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांनी आव्हान उभे केले आहे.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) रखडलेल्या सिंचन योजना आणि त्यांना मिळणारा निधी हा मुख्य मुद्दा असेल.
२) महापुराच्या काळात पूरग्रस्त भागात मंत्री, भाजपचे खासदार-आमदार यांची अनुपस्थिती आणि प्रशासनाला आलेले अपयश यावरून विरोधक रान पेटवतील. ३) मोठ्या उद्योगांची कमतरता-रोजगार, खराब रस्ते हे मुद्देही प्रचारात असतील.

रंगतदार लढती
खानापूर मतदारसंघात यंदाही ‘हाय व्होल्टेज’ सामना होत आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील लढत आहेत, पण अपक्ष म्हणून! येथे काँग्रेस आघाडीने उमेदवार दिलेला नाही. बाबर यांच्या सर्व विरोधकांची ताकद पाटील यांच्यामागे आहे.
जतमध्ये भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना विश्वजित कदम यांचे मावसभाऊ विक्रम सावंत यांनी काँग्रेसकडून आव्हान दिले आहे, तर भाजपमधील नाराज गट, राष्टÑवादी, जनसुराज्य शक्ती आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन भाजपचे बंडखोर डॉ. रवींद्र आरळी यांना उतरवले आहे.
शिराळ्यामध्ये भाजपकडून आमदार शिवाजीराव नाईक आणि राष्टÑवादीकडून मानसिंगराव नाईक हे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. भाजपशी संलग्न असलेल्या विकास आघाडीतील सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केल्याने चुरशीची तिरंगी लढत पहायला मिळत आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Wrestling Nura wrestles in the backyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.